करोनाची धडकी सगळ्या जगालाच भरली आहे. कधी करोनाग्रस्त संपर्कात येईल आणि इतरांना लागण होईल हे सांगता येत नाही. अशातच विदेश वाऱ्या करणाऱ्यांपासून दूरच बरं असंही धोरणं काही जणांनी स्वीकारलं आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघनसोबत असंच काहीसं घडलं आहे. सध्या सुरु असलेल्या पाकिस्तानी सुपर क्रिकेट लीगमधून अनेक विदेशी खेळाडू परत घरी परतत आहेत. मिचेल मॅक्लेनेघनला घरी गेल्यानंतर एक धक्का बसला. करोनाच्या भीतीमुळे त्याची पत्नी चक्क माहेरीच निघून गेली आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा मिचेल मॅक्लेनेघन घरी पोहोचल्यानंतर त्याला एक आश्चर्याचा धक्का बसला. मिचेल घरी येण्यापूर्वीच त्याची पत्नी घर सोडून माहेरी गेली होती. माहेरी जाण्यापूर्वी त्याच्या पत्नीने एक पत्र ठेवलं होतं. या पत्रात तिने दिलेलं कारण वाचून मिचेलला हसू अनावर झालं आणि त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीचं हे पत्र शेअर केलं.

करोना विषाणूच्या भीतीमुळे मिचेलची पत्नी १४ दिवसांसाठी माहेरी गेली आहे. तिचं पत्र वाचल्यानंतर, “घरी आल्यानंतर सगळ्यांपासून दूर झालोय. माझी पत्नी काही आठवडे तिच्या आई-वडिलांसोबत राहणार आहे. त्यामुळे १४ दिवसानंतर तुमची भेट घेईन”, असं कॅप्शन देत मिचेलने पत्नीचं पत्र शेअर केलं आहे.


“ज्यावेळी तू अस्वस्थ होशील तेव्हा फक्त हा विचार कर की परिस्थिती यापेक्षाही जास्त वाईट झाली असती. मात्र आता निदान तुम्ही पत्नीसोबत एका घरात बंद तरी नाहीये. लव्ह यू..”, असं मिचेलच्या पत्नीने या पत्रात लिहीलं आहे.

आणखी वाचा- CoronaVirus : “दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला

दरम्यान, सध्या करोनाचं सावट संपूर्ण जगभरावर आहे. त्यातच पाकिस्तान सुपर लीग सुरु असल्यामुळे मिचेल बराच काळ पाकिस्तानमध्ये होता. याच कारणामुळे करोना विषाणूच्या भीतीमुळे तिने मिचेलपासून काही लांब राहण्याचा निर्णय घेतला आणि आई-वडिलांकडे गेली आहे.