ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू माइक हसी यांचा इशारा

सध्या बेफाम फलंदाजीने नवनवी शिखरे रचणाऱ्या विराट कोहलीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाज संघटितपणे रणनीती आखत आहेत. मात्र मिचेल स्टार्कशी सामना करणे, हे संपूर्ण मालिकेत कोहलीसाठी गंभीर आव्हान असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज माइक हसी यांनी व्यक्त केले आहे.

कोहलीने नुकतेच सलग चार कसोटी मालिकांमध्ये चार द्विशतके झळकावून सर डॉन ब्रॅडमन यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. आगामी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेविषयी हसी म्हणाले, ‘‘आशियाई वातावरणात स्टार्क हा अतिशय उपयुक्त गोलंदाज ठरू शकेल. त्याच्या गोलंदाजीत वेग आहे, नव्या चेंडूनिशी स्विंग करण्याची क्षमता आहे. याचप्रमाणे रिव्हर्स स्विंग हे प्रभावी अस्त्र त्याच्याकडे आहे. त्यामुळेच संपूर्ण मालिकेत कोहलीसाठी स्टार्क हा कर्दनकाळ ठरेल.’’

आगामी मालिकेत कर्णधार स्टीव्ह स्मिथसमोर कोणती आव्हाने असतील, हे विशद करताना हसी म्हणाले, ‘‘स्मिथकडे भारतात खेळण्याचा पुरेसा अनुभव गाठीशी आहे. कसोटी आणि आयपीएल सामने तो भारतात खेळला आहे. त्याने फलंदाजीची योजना आखताना संयम आणि गोलंदाजीची रणनीती आखताना फिरकीपटूंवर विश्वास व्यक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याच्याकडे नॅथन लिऑन आणि स्टीव्ह ओह्णकीफीसारखे फिरकी गोलंदाज आहेत.’’

डेव्हिड वॉर्नर आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात आहे. कोहलीप्रमाणेच तो धावांचे इमले बांधत आहे. मात्र वॉर्नर आणि स्मिथसाठी निराळ्या खेळपट्टय़ांवर वेगळे आव्हान असेल, असे ७९ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या हसी यांनी सांगितले.

‘‘ऑस्ट्रेलियाच्या मोठय़ा धावसंख्येचे सर्वाधिक दडपण हे वॉर्नर आणि स्मिथवर असते. ते दोघेही धावांचे भुकेले आहेत. मात्र भारतात फलंदाजी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असेल, मात्र या मालिकेत आपला प्रभाव पाडण्यासाठी ते उत्सुक असतील,’’ असे हसी यांनी सांगितले.

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘मिस्टर क्रिकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसी यांनी ऑस्ट्रेलियन संघाने दुबईत जाऊन भारत दौऱ्यासाठी केलेल्या विशेष तयारीचे कौतुक केले. मात्र या तयारीचे कामगिरीत कशा प्रकारे रूपांतरण होते, हे पाहायला मला आवडेल, असे त्यांनी सांगितले.

‘‘भारत दौऱ्याकडे ऑस्ट्रेलियाचा संघ गांभीर्याने पाहात आहे. कसोटी सामन्याआधी काही सराव सामन्यांची आवश्यकता होती,’’ असे मत हसी यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीविरुद्ध उत्तम योजना आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडून या दोघांसोबत आयपीएल खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेले हसी म्हणाले, ‘‘दोन्ही फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी प्रत्येक फलंदाजाकडे स्वतंत्र योजना आहे. भारतीय वातावरणात ते पुन्हा परिणामकारक ठरल्यास ऑस्ट्रेलियासाठी ते आव्हानात्मक ठरेल.’’