ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिलांच्या बिग बॅश लिग स्पर्धेत दिग्गज खेळाडू अॅलेसा हेलीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत शतकी खेळी केली. सिडनी सिक्सर्सकडून खेळणाऱ्या हेलीने मेलबर्नविरुद्ध सामन्यात खेळताना मैदानात चौफेर फटकेबाजी करत ४८ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. ५२ चेंडूत १११ धावांची खेळी करणाऱ्या हेलीने मैदानात १५ चौकार आणि ६ खणखणीत षटकार ठोकले. हेलीच्या या शतकी खेळाच्या जोरावर सिडनी संघाने मेलबर्नवर ५ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे आपल्या पत्नीची खेळी पाहण्यासाठी मैदानात आलेला ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क. हेलीने चौकार लगावत शतक पूर्ण केल्यानंतर स्टार्कनेही टाळ्या वाजवत बायकोचं कौतुक केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एप्रिल २०१६ मध्ये मिचेल स्टार्क आणि हॅली यांचा विवाहसोहळा पार पडला. दोघेही जण आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व करतात. मिचेल स्टार्क हा आपल्या वेगवान गोलंदाजी आणि भन्नाय यॉर्कर चेंडूंसाठी ओळखला जातो. तर अॅलेसा हेली ही यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळते. याआधीही फेब्रुवारी महिन्यात महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बायकोला खेळताना पाहण्यासाठी मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया दौऱा अर्धवट सोडून परत मायदेशी परतला होता.