मेलबर्न क्रिकेट मैदानावर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण देशभरातून क्रिकेट प्रेमी महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे, स्टार्कची बायको एलिसा हेले ही ऑस्ट्रेलियन महिला संघाची सदस्य आहे. आपल्या बायकोला अंतिम सामन्यात पाठींबा देण्यासाठी मिचेल स्टार्कने आफ्रिका दौऱ्यातून माघार घेत थेट मेलबर्न गाठलं आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टील लँगर यांनी स्टार्कला परवानगी दिली आहे.

अवश्य वाचा –  मोदींचा स्वॅगच वेगळा ! भारतीय महिला संघाला शुभेच्छा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना कोपरखळी

“अशी संधी एका खेळाडूच्या आयुष्यात नेहमी येत नाही. मिचेलला आपल्या पत्नीला अंतिम सामन्यात खेळताना पहायचं होतं, आणि अशा मोठ्या प्रसंगात कोणालाही आपल्या पत्नीला पाठींबा द्यायला आवडेल. यासाठी आम्ही त्याला लवकर स्वदेशी परतण्याची परवानगी दिली आहे. मिचेल हा आमचा महत्वाचा गोलंदाज आहे. त्याच्यावरही अतिक्रिकेटचा ताण असल्यामुळे…त्याला काहीकाळ विश्रांतीची गरज असते. या निमीत्ताने तो थोडावेळ आपल्या पत्नीसोबत राहिला तर त्यासाठीही ही चांगली गोष्ट असेल.” जस्टीन लँगर यांनी माहिती दिली.

संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमायमा रॉड्रिग्ज, राधा यादव, पूनम यादव, शिखा पांडे यांच्यावर प्रामुख्याने भारताची मदार असेल. ऑस्ट्रेलियसमोर भारताच्या फिरकी गोलंदाजांचे आव्हान असेल.

अवश्य वाचा – Women’s Day Special : क्रिकेट खेळण्यासाठी केस कापले, भावाच्या जागेवर खेळून ठरली मालिकावीर !