भारतीय संघ महिला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर झाला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा इंग्लंडने पराभव केला. या सामन्यात अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले होते. संघातून वगळ्याच्या मुद्द्यावर अखेर मिताली राजने मौन सोडले. या प्रकरणाबाबत मिताली राज हिने संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी याच्यावर आरोप केले आहेत. ‘काही लोकं मला संपवायला टपले आहेत’, असा घणाघाती आरोप करत रमेश पोवार यांनी माझा अपमान केल्याचा आरोप तिने केला आहे.
भारतीय महिला संघ हा यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. त्यानुसार साखळी फेरीत भारताने ४ पैकी ४ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण साखळी फेरीच्या चौथ्या सामन्यात आणि उपांत्य फेरीत भारताची सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि भरवशाची फलंदाज असलेली मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याबाबत मितालीने BCCI चे CEO राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांना पत्र लिहून आपले मौन सोडले आहे.
प्रशिक्षक रमेश पोवार यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला संघाबाहेर ठेवले. हरमनप्रीतशी माझे काहीही भांडण नाही. पण तिने मला वगळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे मला खटकले. त्यात भर म्हणून माजी कर्णधार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांनी माझ्याविरोधात आपल्या पदाचा गैरवापर केला आणि मला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाला एकप्रकारे सहकार्यच केले, असाही आरोप तिने केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 5:00 pm