भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल करण्यात आले. बुधवारी मितालीने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत मितालीने घातलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल करण्यात आले. तर काही युजर्सनी मितालीचे समर्थनही केले. मिताली राजने ट्विटरवर मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरुन नेटिझन्सनी तिखट प्रतिक्रिया दिली. ‘मिताली तू बोल्ड फोटो शेअर केला असून तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही’ असे एका युजरने म्हटले आहे. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. त्यामुळे असे कपडे घालणे तुम्हाला शोभत नाही, हा फोटो डीलीट करा सल्लाही काही यूजर्सनी दिला. यावर मितालीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

मिताली राजला यापूर्वीही ट्विटरवर ट्रोल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मितालीने बंगळुरुत क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले होते. यावेळी मितालीने वेदा कृष्णमुर्ती, ममता माबेन आणि नुशीन अल खादीर यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. यावेळी मितालीचं कौतुक करायचं सोडून एका युजरने मितालीच्या काखेत आलेल्या घामावरुन तिची खिल्ली उडवली होती. यावेळी संयमी मितालीने त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘मी ज्या ठिकाणी उभी आहे, ते फक्त मैदानात अपार कष्ट करुन घाम गाळल्यामुळेच. त्यामुळे घामाची मला अजिबात लाज वाटण्याचं कारण नाही.’ असे उत्तर मितालीने दिले होते.

महिला विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्वाचा वाटा उचललेल्या मिताली राजचं सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. मितालीचे भारतातील महिला क्रिकेटमधील योगदान मोलाचे आहे. विश्वचषकात मिताली राजच्या नेतृत्वाखाली संघाने केलेल्या कामगिरीमुळे महिला क्रिकेटला अच्छे दिन आले आहेत. पण प्रत्येक खेळाडूलाही आपलं खासगी आयुष्य असतं ही बाब नेटीझन्सनही कायम लक्षात ठेवली पाहिजे.