देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. गेले काही दिवस देशात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, संभाव्य धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे यंदाच्या हंगामातील आयपीएलचं भवितव्य कठीण दिसत आहे, असं असतानाही महिला क्रिकेटपटू मिताली राजने बीसीसीआयने पुढच्या वर्षापासून महिलांसाठी आयपीएल सुरु करण्याची मागणी केली आहे. यासाठी आता बीसीसीआयला अधिक थांबण्याची गरज नसल्याचंही मितालीने स्पष्ट केलं.

“माझ्या मते बीसीसीआयने पुढील वर्षापासून महिलांसाठी आयपीएल स्पर्धा सुरु करायला हवी. सुरुवातीच्या वर्षात या स्पर्धेचं स्वरुप छोटं असलं तरीही काही हरकत नाही. काही नियमांमध्येही बदल करता येऊ शकतो. मात्र यासाठी अधिक वेळ लागायला नको.” मिताली ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलत होती. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाला अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला. ऑस्ट्रेलियन महिलांनी भारतीय संघावर मात केली. यानंतर माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनीही महिला संघासाठी आयपीएल स्पर्धा सुरु करण्याची मागणी केली होती.

२०१९ साली बीसीसीआयने प्रायोगिक तत्वावर महिला आयपीएलचे सामने खेळवले होते. यंदाच्या वर्षात बीसीसीआय आयपीएलच्या प्ले-ऑफ सामन्यांदरम्यान महिला संघासाठी विशेष टी-२० चौरंगी मालिका आयोजित करण्याच्या तयारीत होतं. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व गोष्टींवर पाणी फिरलं आहे. “भारतात स्थानिक पातळीवर महिला क्रिकेटपटूंमध्ये अद्याप तितकी प्रगल्भता आलेली नाही हे खरं आहे. पण कधी ना कधी सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्ही यासाठी थांबू शकत नाही. स्पर्धा सुरु झाल्यानंतर कालानुरुप यात बदल होत राहतील.” मितालीने महिला आयपीएलबद्दल आपलं मत मांडलं.