News Flash

खेळपट्टीवरुन रडगाणं बंद करा नी खेळ सुधारा, व्हिव्हियन रिचर्ड्स इंग्लंडच्या खेळाडूंवर बरसले

"जर मला संधी मिळाली असती तर मी चौथ्या सामन्यातही तशीच खेळपट्टी बनवली असती"

(संग्रहित छायाचित्र)

भारत आणि इंग्लंडमध्ये अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला तिसरा कसोटी सामना दोन दिवसांतच संपला. भारताने 10 गडी राखून या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 मार्चपासून अहमदाबादमध्येच होणार आहे. पण तिसरा सामना दोन दिवसांमध्येच संपल्याने खेळपट्टीवरुन बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. अशातच आता वेस्टइंडिजचे माजी महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी खेळपट्टीवरुन सुरू असलेल्या वादात उडी घेतली असून खेळपट्टीचा बचाव करत इंग्लंडच्या खेळाडूंना खडेबोल सुनावलेत. जर मला संधी मिळाली असती तर मी चौथ्या सामन्यातही तशीच खेळपट्टी बनवली असती, असं रिचर्ड्स म्हणालेत.

म्हणून कसोटी क्रिकेट म्हणतात :-

व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत म्हटलं की, भारत-इंग्लंडमध्ये अलिकडेच झालेल्या कसोटी सामन्याबाबत मला अनेकांनी प्रश्न विचारण्यात आले. ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्यावरुन बरीच टीका होतेय…पण जे टीका करतायेत त्यांना हे समजायला हवं की तुम्हाला अनेकदा सीमिंग खेळपट्टी मिळते, गुड लेंथवरुन उसळी घेणारे चेंडू बघितल्यावर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी समस्या असल्याचं अनेकजण विचार करतात. अनेकदा फलंदाजांना तशा खेळपट्टीचा सामना करावा लागतो. पण आता तुम्ही दुसरी खेळपट्टी बघितली…आणि म्हणूनच मला वाटतं याला कसोटी क्रिकेट नाव देण्यात आलं आहे, कारण तुमच्यातील सर्व बाबींची कसोटी यात लागते. खेळपट्टी फिरकली साथ देणारी आहे अशी जर तुमची तक्रार असेल तर ती नाण्याची दुसरी बाजू आहे. लोकं हे विसरतात की तुम्ही भारतात जातायेत तर तुम्हाला अशाच खेळपट्टीची अपेक्षा ठेवायला हवी. तुम्ही फिरकीच्या भूमीवर जात आहात. तुम्ही तिथे कशासाठी जातायेत आणि तिथे कशाचा सामना करावा लागणार आहे याची तुम्ही तयारी करायला हवी.

रडगाणं बंद करा नी खेळ सुधारा :-

कसोटी लवकर संपल्यावरुन रडगाणं गात बसण्यापेक्षा इंग्लंडने परिस्थिती समजून घ्यायला हवी…खेळ सुधारायला हवी…चौथ्या सामन्यात आपल्याला आधीच्याच खेळपट्टीवर खेळावं लागेल असा विचार करुन त्यांनी तयारी करायला हवी. जर मी भारतात असतो किंवा खेळपट्टी बनवणं माझ्या हातात असतं तर चौथ्या कसोटीसाठी मी तशीच खेळपट्टी बनवली असती असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 11:40 am

Web Title: moaning and groaning has to stop legendary west indies batsman vivian richards slams ahmedabad pitch critics sas 89
Next Stories
1 मुंबईत प्रेक्षकांविना ‘आयपीएल’चे सामने?
2 विनेश फोगटला सुवर्णपदक
3 आठवडय़ाची मुलाखत : भारतीय बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील!
Just Now!
X