स्विडन दौऱ्यावर असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. स्टॉकहॉलम युनिव्हर्सिटीत भारतीय समुदायाला उद्देशून भाषण करत असताना मोदींनी, मेरी कोम आणि सायना नेहवालच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला.

“मेरी कोम आणि सायना नेहवाल यांनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये जी कामगिरी केली आहे, त्यामुळे जगभरात भारताची शान वाढली आहे.” मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंगमध्ये तर सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधुला पराभूत करुन सुवर्णपदकावर मोहर उमटवली होती. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करत मोदींनी उपस्थित भारतीयांची मनं जिंकली.

आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी एनडीए सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवला. सध्या आपल्या नेतृत्वाखाली देशात अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यापुढच्या काळात भारताचं नाव सन्मानाने घेतलं जावं यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचंही मोदी म्हणाले.