देशात मोदींची लाट आल्याचे पडसाद आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही पडण्याचे संकेत मिळत आहेत. इतके दिवस बीसीसीआयचे फारसे लक्ष नसलेले गुजरात क्रिकेट मंडळ आता एकदम सक्रिय होण्याची चिन्हे असून, गुजरात क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि मोदींचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मुंबई क्रिकेट संघटनेचे रवि सावंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या जागीच पश्चिम विभागातून अमित शाह उपाध्यक्षपदी येण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी अमित शाह यांच्या निवडीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेचे सहसचिव राजेश पटेल यांनी सांगितले. अमित शाह बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदासाठी पात्र आहेत. त्यांनी बीसीसीआयच्या दोन वार्षिक सर्वसाधारण सभांना उपस्थिती लावली आहे, असेही पटेल म्हणाले.
खुद्द अमित शाह हे सध्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचा २७ वर्षांचा मुलगा जय हा स्वतः बीसीसीआयच्या संदर्भातील घडामोडींमध्ये लक्ष घालतो आहे. जय स्वतः गुजरात क्रिकेट संघटनेचा सहसचिव आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी अमित शाह यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सध्यातरी त्यांना कोणी विरोध करण्याची शक्यता नाही, असे बीसीसीआयमधील एका अधिकाऱयाने सांगितले.