भारतीय टीमचा सर्वात यशस्वी कॅप्टन ठरलेल्या धोनीच्या खांद्यावरच्या जबाबदारीचा भार काहीसा झालाय. आतापर्यंतचा ‘कॅप्टन कूल’ आता यापुढे टीममधला खेळाडू म्हणून बाॅलर्सना ठोकणार आहे.

धोनीची बॅटिंग यापुढेही पहायला मिळणार असल्याने त्याचे चाहते खुश आहेत. पण कॅप्टन कूल त्याच्या पूर्वीच्या कूल हेअरस्टाईलमध्येही दिसेल अशी अपेक्षा करणाऱ्या त्यांच्या फॅन्सचा हिरमोड झालाय. कारण आपण पूर्वी होती तशी लांब केसांची स्टाईल करणार नाही असं धोनीने म्हटलंय.

धोनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला तोच धमाका करत. समोरच्या कुठल्याही बाॅलरला स्टेडियमबाहेर फेकण्याची क्षमता असलेल्या धोनीने भारतीय टीममध्ये आपलं स्थान लवकरच पक्कं केलं. पदार्पणानंतर काही मॅचमध्येच आपल्या आक्रमक शैलीने ‘दे दणादण धोनी’ असं नाव कमावलं. बॅटिंगमध्ये तुफान अॅग्रेसिव्ह असणारा धोनी स्वभावानेही रागीट असेल असं सुरूवातीला त्याच्या फॅन्सना वाटलं होतं. पण हा एवढी हाणामारी डोक्यावर बर्फ ठेवून करतो असं समजल्यावर सगळेजण त्याच्यावर फिदा झाले. क्लीनशेव्हन, हँडसम चेहऱ्यांच्या गर्दीत धोनीची रफ व्यक्तिमत्त्व उठून दिसायचं. टीममधल्या सगळ्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. आणि त्यामुळे राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट टीमच्या कॅप्टनशिपची जबाबदारी धोनीकडे देण्यात आली. धोनीच्या नावाला सचिन तेंडुलकरनेही पसंती दिली होती.

धोनीच्या करिअरच्या या सुरूवातीच्या काळात त्याच्या हेअरस्टाईलविषयी भरपूर चर्चा असायची. मोहम्मद अझरूद्दीननंतर पहिल्यांदाच रगेल चेहऱ्याचा गडी कॅप्टन झाल्याने देशभर मुलींच्या मनातली धकधक वाढली होतीच. पण ‘तेरे नाम’ नंतर आणखी एक वर्ल्ड फेमस हेअरस्टाईल करायला मिळाल्याने आपल्या भिडूंचा पण धोनीला जाम पाठिंबा होता. फुटबाॅलमध्ये विचित्र हेअरस्टाईल आणि टॅटू काढत मैदानावर उतरणाऱ्यांची कमी नाही. पण क्रिकेटसारख्या तुळतुळीत चेहऱ्यांच्या खेळात केविन पीटरसन, विनोद कांबळीनंतर भारतात आणि जगात चर्चेत आलेला माही पहिलाच खेळाडू होता.

भारत-पाकिस्तानसारख्या हाय व्होल्टेज मॅचमध्येसुध्दा धोनीचे केस चर्चेचा विषय ठरले होते. २००६ साली भारताच्या पाकिस्तान दौऱ्यात मॅच पहायला तेव्हाचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ आले होते. ही मॅच सुरू असताना काही पाक फॅन्सनी धोनीला त्याचे केस कापायचा टोमणा हे वाक्य कार्डबोर्डवर मोठ्या अक्षरात लिहित जाहीरपणे दिला होता. ही मॅच संपल्यावर प्रेझेंटेशनदरम्यान मुशर्ऱफनी या टोमण्याचा उल्लेख केला आणि कॅमेऱ्यांसमोर धोनीला म्हटलं की या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, तुझी हेअरस्टाईल तुला छान दिसते.

सौजन्य : यूट्यूब

 

पुढे कॅप्टन झाल्यावर धोनीने आपले केस लहान केले. त्याच्या या नव्या हेअरस्टाईल्ससुध्दा फेमस झाल्या. पण या चापूनचोपून प्रोफेशनली केलेल्या हेअरस्टाईल्सना त्याच्या पहिल्या बिनधास्त ठेवलेल्या लांब केसांएवढी पसंती काही मिळाली नाही.

आता यापुढे आपण लांब केस ठेवणार नसल्याचं धोनी म्हणालाय. जरा वाईट वाटतंय खरं. पण इतकी वर्षं तो आपल्या सगळ्यांसाठी खेळला. आता आपल्या करिअरच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्याला त्याच्या पध्दतीने राहू द्या की भाऊ!