|| स्वदेश घाणेकर

इजिप्तचा बहुतांश भाग वाळवंटाने वेढलेला.. मध्यातून वाहणारी नाईल नदी हीच या देशाची जीवनदायिनी.. त्या नदीभोवती कैरो, आस्वान, लक्झर इत्यादी अनेक शहरे वसलेली.. त्यामुळे इजिप्तचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे सर्व याच शहरांभोवती फिरत राहते..  शेजारील राष्ट्रांशी अधूनमधून उडणारे खटके आणि त्यात दहशतवाद्यांचे हल्ले त्यामुळे येथील जीवनमान अनेकदा अस्थिरच.. २०१० साली झालेल्या अरब क्रांतीदरम्यान इजिप्तमध्येही होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या जुलमी राजवटीविरुद्ध जनआंदोलन सुरू झाले, पण त्यातून अद्याप लोकशाहीची स्थापना झालेली नाही. त्यामुळे येथील परिस्थिती बदलणाऱ्या नायकाची सर्वानाच प्रतीक्षा होती.. अशा या इजिप्त राष्ट्रात हा युवक जन्मला.. मोहम्मद सलाह घाली असे या अवलियाचे नाव..

घर्बिया प्रांतातील नाग्रिग शहरात सलाहचा जन्म. पण त्याची प्रतिमा असलेले चक्क एक विमान इजिप्तमध्ये आहे. रस्त्याकडेच्या भिंतींवर त्याचीच छायाचित्रे पाहायला मिळतात. नाग्रिग या शहरातील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून त्याचेच नाव आघाडीवर आहे. त्याच्या  प्रत्येक गोलनंतर लिव्हरपूल येथील एक हॉटेल ‘फलाफेल्स’नामक प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ ग्राहकांना मोफत वाटतो; इजिप्तपासून कैक किलोमीटर लांब असलेल्या लंडन येथील लिव्हरपूलमध्ये त्याचा चाहता मोफत फलाफेल्स का वाटतो? तर त्याचे उत्तर हे आहे; त्याच्या कामगिरीच्या जोरावर इजिप्तने २८ वर्षांनंतर फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. इंग्लिश प्रीमियर लीग या लंडनमधील प्रमुख फुटबॉल लीगमध्ये लिव्हरपूल क्लबसाठी पदार्पणातच त्याने एका हंगामात सर्वाधिक गोलचा विक्रम केला. याशिवाय अनेक ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार नावावर असलेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांनाही त्याने यंदा मागे टाकले आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या शर्यतीत आता सलाहचे नावही आहे.

इजिप्त आणि लंडन येथीलच नव्हे तर जगभरातील अनेक फुटबॉलप्रेमींना सलाहला जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. ईपीएलच्या हंगामात सर्वाधिक ३१ गोल करण्याचा पराक्रम त्याने केला. ईपीएलच्या २०१७-१८ या हंगामातील सर्वोत्तम खेळाडूचा मान या पठ्ठय़ाने पटकावला, तरीही इतरांत येणारा अहंकार अद्याप त्याच्या आसपासही फिरकलेला नाही. गोल केल्यानंतर उगाच प्रतिस्पर्धी क्लबला डिवचण्यासाठी त्याने कधी नृत्य केले नाही, सहकाऱ्यांना डोक्यावर घेतले नाही, की कधी प्रेक्षकांच्या दिशेने हातवारे केले नाही. गोलनंतर दोन्ही हात कोपरापासून वर करणे, आभाळाकडे पाहत अल्लाहचे आभार मानणे आणि त्यानंतर नमस्कार व सजदा (मुस्लीम बांधवांची नमाज करण्याची पद्धत ) करणे इतकेच काय तो करतो. म्हणूनच त्याच्या कामगिरीनंतर अनेक चाहत्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला.

सलाह एक यशस्वी खेळाडू आहे. आपण लहानपणी सोसलेल्या यातना इतरांच्या वाटय़ाला येऊ  नये म्हणून तो समाजकार्यात अग्रेसर आहे. मुस्लीमबहुल भागात मुलींनी शिकावे, असा त्याचा आग्रह असतो. पण केवळ तोंडाची वाफ न दवडता मुलींसाठी शाळा बांधणे, लोकांच्या आरोग्यासाठी इस्पितळ उभारणे आणि तिथे अत्याधुनिक उपकरणे मिळावी याकरिता निधी देणे अशा समाजोपयोगी कार्यासाठी तो आपल्या वेतनातील बराचसा भाग वापरतो. तरुण पिढी अमली पदार्थाच्या आहारी जाऊ  नये म्हणून सुरू केलेल्या मोहिमेत तो सदिच्छादूत म्हणून सहभागी होतो. त्याने घेतलेली गगनभरारी आणि त्यानंतरही जमिनीवर असलेले त्याचे पाय, यामुळे त्याला युवकांचा आदर्श म्हणून संबोधले जात आहे. लिव्हरपूलचे चाहते त्याला ‘इजिप्शियन किंग’ (इजिप्तचा राजा) असे संबोधतात आणि जगभरात त्याची हीच ओळख झालेली आहे.

राष्ट्रीय संघातील निवड

मे २०१०मध्ये १८ वर्षीय सलाहला वरिष्ठ राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याला बदली खेळाडू म्हणूनचे खेळवण्यात यायचे. मात्र अनुभवाला गुरू मानणाऱ्या या खेळाडूचा खेळ दिवसेंदिवस सुधारत गेला. त्यानंतर तो संघाचा प्रमुख आक्रमणपटू बनला. २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेत इजिप्तकडून सर्वाधिक पाच गोल त्याच्या नावावर आहेत.

फुटबॉलसाठी १० बस बदलायचा

सुरुवातीला केवळ छंद म्हणून जोपासलेला खेळ सलाहच्या आयुष्यचा भाग बनला. त्यानंतर त्याने स्थानिक क्लब ‘एल मोकावलून’मध्ये फुटबॉलचे धडे गिरवायला सुरुवात केली. घरापासून ते क्लबपर्यंत पोहोचायला त्याला पाच बस बदलाव्या लागायच्या आणि आठवडय़ातून पाच दिवस त्याचा हा प्रवास व्हायचा. अर्थात त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला. फुटबॉलसाठी दिवसाच्या आठ तासांच्या प्रवासाचे चक्र चार वर्षे सुरू होते.

चोरांना माफी आणि नोकरी

अलेक्झांड्रिया येथे फुटबॉल सामना खेळत असताना सलाहच्या निग्रिग येथील राहत्या घरी चोरी झाली. काही दिवसांनी पोलिसांनी चोरांना पकडले. मात्र सलाहने आपल्या वडिलांना आरोप मागे घेण्याची विनंती केली. मग त्याने चोरांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली आणि पुढे जाऊन त्या चोरांना नोकरीसुद्धा मिळवून दिली.

क्लब कारकीर्द

२०१२मध्ये इजिप्तिशियन प्रीमियर लीग गुंडाळण्यात आली आणि सलाहसह अनेक खेळाडूंचे भवितव्य टांगणीला लागले. त्या वेळी स्वित्र्झलडच्या बासेल क्लबने सलाहशी चार वर्षांचा करार केला. २०१२-१३ च्या स्वीस सुपर लीग विजयात बॅसेलच्या त्याने सिंहाचा वाटा उचलला. नंतर चेल्सी, फ्लोरेंटिना व रोमा अशा यशस्वी प्रवासानंतर सलाह लिव्हरपूलच्या चमूत दाखल झाला.

वैयक्तिक आयुष्य

  • १५ जून १९९२मध्ये इजिप्त येथील घर्बिया प्रांतातील नाग्रिग येथे सलाहचा जन्म झाला.
  • सलाहने इतरांप्रमाणे पारंपरिक आयुष्य जगावे, अशी पालकांची इच्छा, परंतु सलाहच्या डोक्यात फुटबॉलचे वेड होते.
  • मैदानावर नसतानाही दूरचित्रवाहिनीवर फुटबॉल पाहणे हा त्याचा छंद.
  • अभ्यासात त्याचे मन रमेना, त्यामुळे पालकही चिंतेत होते.
  • त्यांच्यासाठी अभ्यास आणि फुटबॉल यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला.

 

swadesh.ghanekar@expressindia.com