युक्रेन : ईजिप्तचा आघाडीपटू मोहम्मद सलाह याचे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या फुटबॉल विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात डाव्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी सलाह अथक मेहनत घेत आहे, त्यामुळे ईजिप्तच्या संघासाठी तो काही सामने खेळू शकतो, असा आशावाद संघाचे वैद्यांनी व्यक्त केला आहे.

संघाच्या वैद्यांनी स्वत: त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केली. त्याशिवाय ईजिप्तच्या फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हनी अबू रिडा यांनी सुद्धा सलाहची भेट घेतली. ‘‘वैद्य आणि फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष अबू रिडा यांनी भेट घेतल्यानंतर सलाह विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होण्याच्या आशा बळावल्या आहेत. खांद्याच्या स्नायुंचे नियंत्रण करण्यास तीन आठवडय़ांचा अवधी पुरेसा आहे, असे ट्विट संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आले. ईजिप्तचा पहिला सामना १५ जूनला उरुग्वेशी होणार आहे.

रेयाल माद्रिदविरद्ध अंतिम फेरीच्या सामन्यात कर्णधार सर्गियो रामोसशी अप्रत्यक्षरीत्या झालेल्या धक्काबुक्कीमुळे सलाह खाली कोसळला. दुखापतीतून सावरण्यासाठी निदान तीन ते चार आठवडे विश्रांतीचा सल्ला लिव्हरपूल संघाच्या वैद्यांद्वारे त्याला देण्यात आला आहे.

विश्वातील आघाडीचे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांच्याशी तुलना करण्यात येणाऱ्या २५ वर्षीय सलाहने यंदा लिव्हरपूलसाठी सर्वाधिक ४४ गोल नोंदवले आहेत. ‘‘येणाऱ्या तीन ते चार आठवडय़ांमध्ये आम्ही सलाहवर अथक मेहनत घेऊन त्याला विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे,’’ असे लिव्हरपूलचे वैद्यकीय अधिकारी रुबेन पॉन्स म्हणाले. याव्यतिरिक्त सलाह स्वत: जे झाले ते विसरून दुखापतीतून लवकरात लवकर सावरण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात रेयाल माद्रिदने लिव्हरपूलचा ३-१ असा पराभव केला. ‘‘सलाह ज्यावेळी मैदानावर कोसळला त्यावेळीच आम्हाला त्याला असह्य़ वेदना होत आहेत हे जाणवले. तो कधीच कोणतीही तक्रारसुद्धा करत नसल्यामुळे आम्ही घाबरलो होतो. लिव्हरपूलच्या पराभवाची बातमी मिळताच सलाह निराश झाला. ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेल्यावर त्याला स्वत:चे कपडे बदलण्यातही त्रास जाणवत होता,’’ असे पॉन्स म्हणाले.