पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने कसोटी क्रिकेटमधून गुरुवारी तडकाफडकी निवृत्ती स्विकारली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आमीरने आपला निर्णय कळवला. पण पाकिस्तानसाठी मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये आमीर खेळत राहणार आहे. “कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करायला मिळाले हा माझा गौरव आहे, पण आता मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे आणि म्हणूनच मी कसोटीतून निवृत्ती स्वीकारत आहे”, असे त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितले. पण त्याच्या निवृत्तीमुळे माजी पाक क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि शोएब अख्तर या दोघांनी आश्चर्य व्यक्त केले.

माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने आमिरच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ट्विट केले. “मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणे हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. कारण २७-२८ हे वय तुमच्या कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा असतो आणि कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्या प्रतिभेचा कस लागतो. आगामी काळात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ तर इंग्लंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यासाठी आमिरची पाकिस्तानला नक्कीच गरज भासणार आहे”, असे ट्विट अक्रमने केले.

‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर यानेही आमिरच्या निवृत्तीवर नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले. “आमिरच्या निवृत्तीमुळे मला अतिशय दुःख झाले आहे. आमिरला पुनरागमन करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सहकार्य केले होते. आता त्याच्याकडून पाकिस्तान क्रिकेटची सेवा करण्याची अपेक्षा होती. पाकिस्तानचा कसोटी संघ सध्या फारसा चांगला नाही. त्यामुळे आताच आमिरची पाकिस्तानला खरी गरज होती. मी माझ्या गुडघ्याच्या दुखापतीतही सामने खेळून पाकला विजय मिळवून दिले होते. त्याच्याकडूनही तशीच अपेक्षा होती”, असे मत अख्तरने व्यक्त केले.

दरम्यान, इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला. जुलै २००९ साली श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटी सामन्यात आमीरने पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ३६ कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केले. या सामन्यांमध्ये आमीरने ३० च्या सरासरीने ११९ बळी घेतले.