‘‘हा खटला प्रदिर्घकाळ चालला आणि तो वेदनादायी होता. आम्ही ११ वष्रे न्यायालयाशी लढलो. या खटल्यामध्ये अनेकदा स्थगिती आणि बदल झाले. पण अखेर निकाल सकारात्मक लागला. न्यायालयाने माझ्यावरील आजीवन बंदी उठवल्याचा अत्यंत आनंद होतो आहे,’’ असे मोहम्मद अझरुद्दीनने सांगितले. या निर्णयानंतर आता बीसीसीआयवर कायदेशीर कारवाई करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना अझर म्हणाला की, ‘‘मी कोणत्याही यंत्रणेविरोधात कायदेशीर दाद मागणार नाही. मी याबाबत कोणालाही जबाबदार धरत नाही. जे काही घडायचे होते, ते घडून गेले आहे. आता माझी कोणतीही तक्रार नाही.’’
‘‘ही बंदी बेकायदेशीर होती, म्हणूनच ती उठविण्यात आली. परंतु मी याबाबत फार काही बोलणार नाही. मला जे काही बोलायचे होते, ते माझे मत वकिलामार्फत न्यायालयात मांडले आहे. मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकरीत्या पाहतो. आता मी आनंदाने पुढे पाहात आहे,’’ असे अझर यावेळी म्हणाला. हॅन्सी क्रोनिए यांच्या मॅच-फिक्सिंग प्रकरणाबाबत बोलायचे अझरने प्रकर्षांने टाळले. ‘‘क्रोनिए आता जिवंत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणे योग्य ठरणार नाही,’’ असे अझरने सांगितले.