काही महिन्यांपूर्वीच आयसीसीने अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी खेळणाऱ्या देशांचा दर्जा दिला. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी होती. या कामगिरीचं फळ म्हणून अफगाणिस्तानला आयसीसीने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा दिला. यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकपदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफला गळ घातली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. भारताचे लालचंद राजपूत हे आतापर्यंत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघत होते. मात्र राजपूत यांचा कराराचं नुतनीकरण केलं जाणार नसल्याचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही मोहम्मद कैफ हा स्थानिक रणजी सामन्यांमध्ये खेळतो. छत्तीसगड संघाचा प्रशिक्षक आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी सध्या मोहम्मद कैफकडे आहे. १३ कसोटी आणि १२५ वन-डे सामने खेळण्याचा मोहम्मद कैफला अनुभव आहे. या आठवड्याअखेरीस मोहम्मद कैफ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर स्वीकारल्यास मोहम्मद कैफ हा अफगाणिस्तानचा दुसरा भारतीय प्रशिक्षक ठरणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर स्वीकारल्यास मोहम्मद कैफला स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागेल. आयपीएलमध्ये मोहम्मद कैफने गुजरात लायन्स या संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. भारतीय संघात असताना मोहम्मद कैफ चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जायचा. याशिवाय, त्याने लॉर्डसच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध साकारलेली ८७ धावांची खेळी आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर स्विकारल्यास मोहम्मद कैफ हा अफगाणिस्तानचा दुसरा भारतीय प्रशिक्षक ठरणार आहे.