प्रस्थापित देशातील खेळाडूंना साजेसा खेळ करत अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहझादने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत ६७ चेंडूंत ११८ धावांची विक्रमी खेळी साकारली. ट्वेन्टी-२० प्रकारातील ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. संलग्न देशांतर्फे शतक झळकावणारा शहझाद केवळ दुसरा खेळाडू आहे. या लढतीदरम्यान मोहम्मदने ट्वेन्टी-२० प्रकारात हजार धावा करण्याचा मानही पटकावला. मोहम्मदच्या अफलातून खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेवर ८१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. मोहम्मद शहझादला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
शहझादने संपूर्ण डावात नाबाद राहण्याचा विक्रमही नावावर केला. २० षटके खेळताना शहझादने १० चौकार आणि ८ षटकारांसह ११८ चेंडूंची वेगवान खेळी केली. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र शहझादच्या सर्वागीण फटकेबाजीसमोर झिम्बाब्वेचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. अन्य सहकारी ठरावीक अंतरात विकेट्स गमावत असतानाही शहझादने तडाखेबंद टोलेबाजी केली. तेंदई चिसोरोच्या गोलंदाजीवर एक धाव घेत शहझादने ५२व्या चेंडूंतच विक्रमी शतक पूर्ण केले. शहझादच्या विक्रमी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने २१५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेचा डाव १३४ धावांतच आटोपला. हॅमिल्टन मासाकाटझाने ४४ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली मात्र ती व्यर्थच ठरली. अफगाणिस्तानकडून दावलत झाद्रान, आमिर हम्झा आणि सय्यद सिरझाद यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.
‘‘हे माझे आवडते मैदान आहे. इथे फलंदाजी करताना मजा येते. कोणतीही योजना नव्हती. प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर धाडणे हेच उद्दिष्ट होते. झिम्बाब्वेविरुद्ध सातत्याने खेळत असल्याने त्यांच्या गोलंदाजीची माहिती होती. कर्णधार अशगरशी माझे बोलणे झाले होते. या मैदानावर दीडशे धावा पुरेशा होत्या,’’ असे शहझादने सांगितले.