बांगलादेशविरुद्ध इंदुरमध्ये झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा एक डाव आणि १३० धावांनी झालेल्या विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाल यांनी आयसीसीच्या अद्ययावत कसोटी क्रमवारीत रविवारी आपले आजवरचे सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले. पहिल्या डावात २७ धावा देत तीन बळी आणि दुसऱ्या डावात ३१ धावा देत चार बळी घेणाऱा शमी आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर ७९० रेटिंग गुण आहेत. जे कसोटीतील भारतीय वेगवान गोलंदाजाच्या सर्वोत्कृष्ट तिसऱ्या क्रमांकावरील आहेत.

याबाबत कपिल देव (८७७ गुण) आणि जसप्रीत बुमराह (८३२ गुण) हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. बांगलादेशविरुद्ध करिअरच्या सर्वाधिक २४३ धावा करीत ‘मॅन ऑफ दि मॅच’ ठरलेला २८ वर्षीय मयांक अग्रवाल हा फलंदाजीच्या क्रमवारीत ११ स्थानावर आहे. करिअरच्या सुरुवातीच्या आठ कसोटी सामन्यांमध्ये ८५८ धावा करणाऱ्या या फलंदाजाच्या नावे ६९१ रेटिंग गुण आहेत.

सुरुवातीच्या आठ कसोटी सामन्यांत केवळ ७ फलंदाजांनी मयांकपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये डॉन ब्रॅडमन (१२१०), एवर्टन विक्स (९६८), सुनील गावस्कर (९३८), मार्क टेलर (९०६), जॉर्ज हेडली (९०४), फ्रँक वॉरेल (८९०) आणि हर्बर्ट सटक्लिफ (८७२) यांचा समावेश आहे. भारताच्या चार फलंदाजांचा अव्वल १० जणांमध्ये समावेश आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली दुसऱ्या, चेतेश्वर पुजारा चौथ्या, अजिंक्य रहाणे पाचव्या तर रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहेत.

रविंद्र जडेजा फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांनी झेप घेत संयुक्तपणे ३५व्या स्थानावर पोहोचला आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (२०), उमेश यादव (२२) यांनीही आपल्या क्रमवारीत एक एक स्थानाने सुधारणा केली आहे. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने देखील अव्वल १० गोलंदाजांमध्ये सामिल झाला आहे.

बांगलादेशच्यावतीने ४३ आणि ६४ धावांची खेळी करणारा मुशफिकुर रहीम पाचव्या स्थानाच्या सुधारणेसह ३० व्या स्थानी पोहोचला आहे. लिटन दास ९२ वरुन ८६ व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये चार बळी घेणारा अबू झायेद १८ व्या स्थानाने सुधारणा करीत ६२ व्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, भारताने आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये बढत मिळवत आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.