विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. २०१९ चं वर्ष गाजवल्यानंतर भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवातही मोठ्या धडाकेबाज पद्धतीने केली आहे. भारतीय गोलंदाजांचीही गेल्या काही सामन्यांमधली कामगिरी ही उल्लेखनिय आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवलं आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही मोहम्मद शमीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

“मोहम्मद शमी हा चतुर गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला शमी हा जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे. तुम्ही त्याला कोणत्याही प्रसंगात गोलंदाजी करायला द्या, तो तुम्हाला चांगले निकाल देतो. विश्वचषक स्पर्धा असो किंवा न्यूझीलंडमधील सामने…शमीला गोलंदाजीत नेमके कधी बदल करायचे आहेत हे माहिती आहे. ज्यावेळी त्याला समजतं की एखाद्या खेळपट्टीवर यॉर्कर चेंडू काम करणार नाही, त्यावेळी तो लगेच चेंडूचा टप्पा आणि दिशा बदलतो. ज्यावेळी गरज असेल तिकडे बाऊन्सर चेंडू टाकायलाही तो मागेपुढे पाहत नाही.” शोएब अख्तर आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलत होता.

अवश्य वाचा – व्हाईटवॉशच्या उद्देशाने आम्ही मैदानात उतरु – मनिष पांडे

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. शमीने शेवटच्या षटकात भेदक मारा करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं. दरम्यान ५ सामन्यांच्या मालिकेत भारताकडे सध्या ४-० अशी आघाडी आहे…त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.