भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान हसीन जहाँने ममता बँनर्जींकडे मोहम्मद शमीविरोधात केलेल्या आरोपांचा ३ पानी अहवाल दिला असून आपल्याला ममता दीदींनी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं हसीन जहाँ म्हणाली. पश्चिम बंगालच्या विधान भवनात ममता दीदी आणि हसीन जहाँची १० मिनीटांसाठी भेट झाल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – मॅच फिक्सिंगच्या आरोपात मोहम्मद शमीला क्लीनचीट, BCCI कडून ग्रेड बी कॉन्ट्रॅक्टची ऑफर

“ममता दीदींशी झालेल्या आजच्या भेटीत मी माझी बाजू त्यांच्यासमोर मांडली आहे. त्यांनी वेळात वेळ काढून माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे, याचसोबत या प्रकरणी मला जी मदत लागेल ती मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे.” व्यक्ती कितीही मोठा असो त्याच्यावर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल आणि शेवटी सत्याचा विजय होईल, असं म्हणत हसीन जहाँने हा लढा अद्याप संपला नसल्याचं बोलून दाखवलं.

अवश्य वाचा – देशाबद्दलच्या एकनिष्ठतेवर शंका घेतली म्हणून दुखावलो – मोहम्मद शमी

दरम्यान बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने, शमीची फिक्सींगच्या आरोपांमधून मुक्तता केली आहे. यानंतर विनोद राय यांच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने शमीचा राखून ठेवलेला करार पुन्हा एकदा करण्यास अनुमती दर्शवली आहे. शमीचा बीसीसीआयच्या ‘ब’ गटातील खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. हसीन जहाँने काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीवर मॅच फिक्सींगचे आरोप केले होते. एका पाकिस्तानी मुलीच्या माध्यमातून शमीने एका बुकीकडून पैसे स्विकारल्याचा आरोप हसीन जहाँने केला होता. याचसोबत शमीचे अन्य मुलींसोबत अनैतिक संबंध असून त्याच्या परिवाराकडून आपल्याला धोका असल्याचं सांगत हसीन जहाँने शमीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

अवश्य वाचा – मोहम्मद शमी-हसीन जहाँ प्रकरणी मोहम्मद भाईचा मोठा खुलासा