13 December 2018

News Flash

मोहम्मद शमीच्या पत्नीची सटकली, तोडून टाकला मीडियाचा कॅमेरा

मीडिया हे एखादं युद्द असल्याप्रमाणे भासवत आहे

क्रिकेटर मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँमधील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोहम्मद शमीवर आरोप करुन क्रिकेट विश्वात खळबळ माजवणा-या हसीन जहाँची मंगळवारी काही पत्रकारांसोबत वादावादी झाली. कोलकातामधील सेंट जोसेफ शाळेत हा प्रकार घडला. यावेळी हसीन जहाँ एका प्रश्नावर इतकी संतापली की, तिने एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा कॅमेराच तोडून टाकला. यानंतर आपल्या कारमध्ये बसून तेथून निघून गेली. मोहम्मद शमीवर दुस-या तरुणींसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप केल्यापासून हसीन जहाँ चर्चेत असून सतत मीडियाच्या प्रश्नांना सामोरी जात आहे. पण कोलकातामध्ये एका प्रश्नावर हसीन जहाँचा पारा चढला आणि तिने मीडियाचा कॅमेरा तोडून टाकला. मोहम्मद शामीवर आरोप करुन प्रकाशझोतात आलेल्या हसीन जहाँला आता प्रसारमाध्यमांनी वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये असं वाटू लागलं आहे.

हसीन जहाँचे वकील झाकीर यांनी सांगितलं आहे की, ‘प्रायव्हेट स्पेस काय असतं हे मीडियाला समजायला हवं. आम्ही सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असताना मीडिया मात्र हे एखादं युद्द असल्याप्रमाणे भासवत आहे’. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंधांसोबतच घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला आहे. हसीन जहाँने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन व्हॉट्सअॅपचे स्क्रिनशॉट शेअर करत मोहम्मद शामीवर आरोप केले होते. यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे.

दरम्यान मोहम्मद शमीच्या नातेवाईकांनी रविवारी त्याची पत्नी हसीन जहाँच्या वकिलाची भेट घेतली. हे प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटावं यासाठी प्रयत्न केला जात आहे. हसीन जहाँच्या वकिलांनी बातचीत झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे, मात्र सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. यासोबतच शमीचे कुटुंबीय कोलकातामधील काही वकिलांच्या संपर्कात असल्याचंही कळत आहे.

हसीन जहाँने शमी आणि आपल्या कुटुंबियांमध्ये तडजोडीसाठी प्रयत्न सुरु असल्याची कल्पना असल्याचं सांगितलं आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, ‘याप्रकरणी तपास सुरु आहे. काय तडजोड होईल याची मला कल्पना नाही. एफआयआर दाखल करण्याआधी मी शमीला अनेक फोन केले. पण त्याने एकाही कॉलचं उत्तर दिलं नाही. एक पत्नी असण्यासोबत मी एक आईही आहे. माझ्या मुलीचं भविष्य सध्या अंधारात आहे. शमीला सुधरवण्यासाठी जे काही केलं जाऊ शकतं ते सर्व मी केलं. पण त्या बदल्यात मला फक्त धमक्या आणि अपमानच मिळाला. मला आता काहीच बोलायचं नाही. त्यांना माझ्या वकिलाशी बोलावं लागेल’.

First Published on March 13, 2018 6:00 pm

Web Title: mohammad shamis wife hasin jahan gets angry on media breaks down camera