भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज टीम स्पिरिटचं एक अनोख उदहारण पाहायला मिळालं. संघ भावनेच्या दृष्टीने निश्चित ही एक चांगली गोष्ट आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून मार खाल्ल्यानंतर पेटून उठलेल्या भारतीय संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन केलं आहे. रविचंद्रन अश्विनने तर गोलंदाजी बरोबर फलंदाजीनेही सर्वांची मनं जिंकून घेतली. ज्या चेन्नईच्या खेळपट्टीला नाव ठेवली जात होती, त्याच विकेटवर त्याने शतक झळकवून टीकाकारांची तोंडं बंद केली.

दरम्यान अश्विन शतकाच्याजवळ असताना मैदानावर त्याला मोहम्मद सिराज साथ देत होता. सिराज भरवशाचा गोलंदाज म्हणून हळूहळू स्वत:ची ओळख बनवत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. आज दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेन्नईच्या कठिण खेळपट्टीवर त्याने थंड डोक्याने खेळ करत अश्विनला मोलाची साथ दिली. सिराज ९.१ षटकं खेळपट्टीवर होता. २१ चेंडूत त्याने नाबाद १६ धावा केल्या. चेन्नईच्या विकेटवर आज बॉल ज्या पद्धतीने वळत होता, त्यामुळे खेळपट्टीवर टीकाव धरणे इतके सोपे नव्हते. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना सिराज ज्या पद्धतीने सामना करत होता, ते पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांकडून त्याला भरपूर साथ मिळत होती.

मोइन अलीच्या षटकात अश्विनने शतक झळकावले. त्यावेळी स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षकाने आणि भारतीय ड्रेसिंग रुममधील खेळाडूंनी उभे राहून टाळया वाजवून अश्विनचे कौतुक केले. त्यावेळी मैदानावर असलेल्या सिराज सुद्धा आपला आनंद लपवू शकला नाही. त्याने मैदानावर हवेत उडी मारुन आपल्या सहकाऱ्याच्या शतकाचा आनंद साजरा केला. भले सिराजने बॅटीने मोठी कमाल केली नसेल, पण संघभावनेचे त्याने जे उदहारण सादर केले, त्यातून त्याने सर्वांची मने जिंकून घेतली.