चेन्नईमधील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी भारताचा पराभव केला आहे. पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असून अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. कसोटी सामन्यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ऑस्ट्रेलियाविरोधातील विजयानंतर चर्चेत असणाऱ्या मोहम्मद सिराजने कुलपीद यादवचा गळा पकडल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली असून बीसीसीआयकडून यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण न दिल्याने क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत आहेत.

व्हिडीओत मोहम्मद सिराज ड्रेसिंग रुममध्ये परतणाऱ्या खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसत आहे. जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूची मोहम्मद सिराज पाठ थोपटत होता. कुलदीप यादव समोर येताच मात्र मोहम्मद सिराज त्याचा गळा पकडतो. यावेळी मोहम्मद सिराज खूप संतापलेला दिसत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे मोहम्मद सिराज कुलदीप यादवची कॉलर पकडतो आणि आपल्या जवळ खेचतो. मात्र यावेळी नेमकं काय झालं होतं हे अद्यापही उघड झालेलं नाही.

दरम्यान बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणावर अद्यापही स्पष्टीकरण दिलं नसल्याने क्रिकेट चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

भारताचा पराभव
भारताला विजयासाठी ४२० धावांचं लक्ष मिळालं होतं. पण अखेरच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहलीनं सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून फिरकीपटू जॅक लीड यानं सर्वाधिक चार बळी घेतले. कोहलीने पराभवाचं कारण सांगताना म्हटलं आहे की, ‘भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजावर दबाव निर्माण करण्यात अपयश आलं. गोलंदाजी म्हणून या सामन्यात आम्हाला अपयश आलं. अश्विन आणि वेगवान गोलंदाजी वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली. दबाव कायम ठेवण्यात आम्हाला अपयश आलं‘.