मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत बुधवारी केरळने मुंबईवर मात केली. केरळच्या संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीनने सचिन बेबीच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघातील दोन महान माजी फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांची नावे अनेकदा चाहत्यांनी ऐकली होती. केरळचा सामना सुरू असताना अझरूद्दीन आणि सचिन हे एकत्र मैदानात आल्यानंतर सोशल मीडियावर या नावांमुळे दोघेही ट्रेंडमध्ये आले. याशिवाय मोहम्मद अझरूद्दीनने तर खरंच दमदार खेळ केला आणि आपला ठसा उमटवला.

मोहम्मद अझरूद्दीन याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी केली. त्याने अवघ्या ५४ चेंडूंत नाबाद १३७ धावा कुटल्या. त्याच्या खेळीच्या जोरावरच केरळ संघाने मुंबईवर आठ गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद अझरुद्दीनने ३७ चेंडूत शतक झळकावले. केरळकडून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला. या आधी केरळच्या रोहन प्रेम याची ९२ ही केरळच्या फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या होती. तो विक्रम अझरूद्दीनने मोडला. पहिले दोन गडी बाद झाल्यानंतर सचिन बेबीने अझरूद्दीनसोबत मैदान सांभाळत विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यास मदत केली.

मोहम्मद अझरुद्दीनने ५४ चेंडूंत फटकावलेल्या १३७ धावा ही टी२० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी श्रेयस अय्यरने टी२० क्रिकेटमध्ये १४७ धावा फटकावल्या होत्या. तर याच स्पर्धेत मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिश्त याने ५१ चेंडूत १४६ धावा कुटल्या होत्या. याशिवाय या स्पर्धेतील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले.