भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेमधील पाचवा सामना जिंकत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. वेस्ट इंडिज संघाचा १२५ धावांनी पराभव करत भारताने गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी विंडिज संघाला अवघ्या १४३ धावांवर गुंडाळले. भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व या सामन्यामध्ये दिसून आले. भारतीय चाहतेही या सामन्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय गोलंदाजांनी घेतलेली प्रत्येक विकेट चाहते आरोळ्या, शिट्ट्या आणि झेंडे फडकवत साजरी करत होते. मात्र कालच्या सामन्यातील सर्वात आगळेवेगळे सेलिब्रेशन केले ते भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामीने. शेल्डॉन कॉटरील बाद झाल्यानंतर शमीने सॅल्यूट ठोकत सेलिब्रेशन केले.

पाच फलंदाज बाद झाल्यानंर ब्रेथवेट, ऍलन यांना बुमहारने झटपट माघारी पाठवले. विंडीजचा डाव गडगडला. विंडीजचे आठ गडी २९ व्या षटकापर्यंत तंबूत परतले होते. सामन्यातील ३० व्या षटकामध्ये युझवेन्द्र चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात कॉटरील पायचीत झाला. चहलचा गुगली कॉटरीलला समजलाच नाही आणि षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा कॉटरील चौथ्या चेंडूवर बाद झाला. १२४ धावांवर कॉटरीलची विकेट पडली तेव्हा विंडिजचे नऊ फलंदाज तंबूत परतले होते आणि भारताच्या विजयावर केवळ औपचारिकता शिल्लक राहिली होती. कॉटरील बाद झाल्यानंतर शामीने सलाम ठोकत सेलिब्रशन करुन त्याला हसतच निरोप दिला. शामीच्या या सेलिब्रेशनची अगदी समालोचकांमध्येही चर्चा झाली. विशेष म्हणजे या सामन्यामध्ये कॉटरीलनेच शमीला शुन्यावर बाद केले होते. त्यावेळी त्याने सॅल्यूट ठोकत आनंद साजरा केला होता. शमीनेही कॉटरील बाद झाला तेव्हा तशाच पद्धतीने आनंद साजरा करुन त्याची परतफेड केली. शामीच्या या सेलिब्रेशनवर चहल आणि कोहलीही हसताना दिसले.

काय आहे या सेलिब्रेशनचा अर्थ

विरोधी संघातील फलंदाजाला बाद केल्यानंतर कॉटरील नेहमीच परेडमध्ये सॅल्यूट करतात त्याप्रमाणे सावधान स्थितीमध्ये चार पावले चालत येऊन सॅल्यूट करत फलंदाजाला निरोप देतो. कॉटरीलची ही सेलिब्रेशन करण्याची पद्धत आता क्रिकेटच्या चाहत्यांना ठाऊक झाली आहे. मध्यम गतीचा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असणाऱ्या कॉटरील विडिंजच्या संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. अनेकदा विकेट मिळाल्यानंतर त्याचे हे आगळे वेगळे सेलिब्रेशन अनेकदा पहायला मिळते. कालच्या भारताविरुद्धच्या सामन्यात कॉटरील बाद झाल्यानंतर शामीनेही त्याला त्याच्याच अनोख्या स्टाइलने सॅल्यूट करत निरोप दिला. कॉटरीलनेही शामीच्या या सेलिब्रेशनचे वाईट वाटून न घेता शमीच्या या सेलिब्रेशनवर हसतच मैदान सोडले.

कॉटरीलचे हे सॅल्यूट सेलिब्रेशन भारताविरुद्धच्या सामन्यात दोनदा पहायला मिळाले. कॉटरीलने हार्दिक पांड्या आणि शामीला बाद केले त्यावेळी त्याने हे ट्रेडमार्क सेलिब्रेशन केलं.