कोलकाताच्या इडन गार्डनवरील भारत विरुध्द न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने विजय प्राप्त केला. याआधी कानपूरमध्ये झालेल्या सामन्यात देखील टीम इंडियाने विजय नोंदवला होता. इडन गार्डनमधील सामन्यादरम्यान भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीने शानदार प्रदर्शन केले. न्यूझीलंडच्या अनेक फलंदाजांना त्याने तंबूत पाठवले. या सामन्यात त्याने ६ बळी मिळवले. सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी चक्क खुर्च्यांवर उभे राहून त्याच्या या कामगिरीला दाद देत त्याचे मनोबल वाढविले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय प्राप्त करून देण्यात मुख्य भूमिका बजाविणाऱ्या शमीची चिमुकली आयसीयूमध्ये भर्ती असतानादेखील तो देशासाठी खेळत राहिला.
कसोटी सामन्याच्या दोन दिवसआधी शमीच्या १४ महिन्याच्या मुलीला आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आले होते. तिला ताप आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. सामन्यादरम्यान शमी खेळ संपल्यानंतर स्टेडियममधून निघून आपल्या चिमुकलीला पाहाण्यासाठी थेट रुग्णालयात जात असे. नंतर रात्री हॉस्टेलमध्ये परतत असे. हॉस्पिटलमध्ये मुलीला पाहिल्यानंतर जेव्हा मी रात्री परतत असे तेव्हा प्रत्येक दिवशी संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्याला खूप प्रेरणा देत होता, असे विराटचे कौतुक करताना शमी म्हणाला. हे सांगत त्याने विराटचे अभारदेखील मानले. कसोटी सामना संपेपर्यंत सर्वकाही ठिक होईल असे सांगत आश्वस्त करणाऱ्या संघातील सहकाऱ्याचेदेखील त्याने आभार मानले. शमीच्या मुलीची प्रकृती आता ठीक असून, सोमवारी ती घरी परतल्याचे काही वृत्तपत्रांमध्ये म्हटले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला नमवून भारताने कसोटी मालिकेवर आपले नाव कोरले. याबरोबरच कसोटी क्रिकेट प्रकारात भारत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.