वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आगामी आशिया चषक क्रिकेट स्पध्रेतून माघार घेतली आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याच्या खेळण्याबाबतही साशंका निर्माण झाली आहे. निवड समितीने शमीऐवजी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा भारतीय संघात समावेश केला आहे.
गेल्या वर्षी विश्वचषकात झालेल्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शमीला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे शमीला माघार घ्यावी लागली होती.
‘‘बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने शमी आशिया चषक स्पध्रेत खेळणार नसल्याची निश्चिती केली. मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने त्याला विश्रांती देण्यात आली आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.