भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ ही कायम चर्चेत आहे. २०१८मध्ये तिने शमीवर केलेल्या आरोपांमुळे ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. त्यानंतर सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये काही ना काही कारणांनी ती चर्चेचा विषय ठरते. आतादेखील हसीन जहाँबाबत नवी चर्चा रंगू लागली आहे. हसीन जहाँने महिन्याभरापूर्वी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल अभिनंदन करणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे तिला जीवे मारण्याची आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासंदर्भात आता तिने सुरक्षेची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीबद्दल तिने लालबझारच्या कोलकाता पोलीस सायबर विभागाच्या शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता महिन्याभरानंतर तिने कलकत्ता उच्च न्यायालयात तिच्यासाठी व तिच्या मुलीसाठी सुरक्षा पुरवण्यात यावी अशी याचिका दाखल केली आहे. ९ ऑगस्टला तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कोणताही तपास केला नाही असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बहुसंख्य भारतीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हसीन जहाँनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. “अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल सर्व हिंदू समाजाचे मन:पूर्वक अभिनंदन” अशा शुभेच्छा देणारा तो फोटो होता. याच फोटोत प्रभू श्रीराम यांचा एक फोटो आणि राम मंदिराचा एक फोटोदेखील होता. तिच्या या पोस्टनंतर तिला धमकी मिळाली आणि तिने पोलिसात तक्रार केली होती.

२०१८मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर काही आरोप केले होते. तेव्हापासून ती चर्चेत असते. तसेच काही वेळा ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे.