वन-डे विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना, भारतीय संघाची निवड हा अजुनही कळीचा मुद्दा ठरला आहे. संघात पर्यायी गोलंदाज, पर्यायी सलामीवीर म्हणून कोणाला जागा मिळणार याबाबत अजुनही संभ्रम आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय गोलंदाज अतिशय चांगल्या फॉर्मात आहेत. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे गोलंदाज सध्या विरोधी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने मात्र आगामी विश्वचषकासाठी मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा हुकुमाचा एक्का ठरेलं असं मत व्यक्त केलं आहे.

“गेल्या काही सामन्यांमध्ये मोहम्मद शमी चांगला खेळ करतो आहे. कसोटी क्रिकेटमध्येही तो मोठे स्पेल टाकतो आहे. त्याने शाररिक तंदुरुस्तीवरही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी शमी हा भारताचा हुकुमाचा एक्का ठरणार आहे.” CricketNext या संकेतस्थळाशी बोलत असताना नेहरा बोलत होता. याचवेळी बोलत असताना आशिष नेहराने शमी सपाट खेळपट्टीवरही चांगला मारा करु शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत पहिल्या सामन्यात शमीने चांगला मारा केला. आगामी विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे, त्यामुळे या मालिकेत मोहम्मद शमी आणि भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.