सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. कसोटीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचे राष्ट्रगीत सुरु असताना सिराजच्या डोळयात अश्रू तरळले. मैदानावरील कॅमेऱ्यान लगेच हे दृश्य टिपले.

नेमकं त्यावेळी सिराजच्या डोळयात कशामुळे पाणी आलं? ते स्वत: सिराजने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. “मैदानावर राष्ट्रगीत सुरु असताना मला माझ्या वडिलांची आठवण झाली, त्यामुळे मी भावून झालो होतो” असे सिराजने सांगितले.

मोहम्मद सिराज मूळचा हैदराबादचा आहे. तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना २० नोव्हेंबरला त्याच्या वडिलांचे निधन झाले. सिराजच्या वडिलांना त्याला भारतीय संघासाठी खेळताना बघायचे होते, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिराज ऑस्ट्रेलियातच थांबला.

“त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या आठवणीने भावूक झालो होतो. कसोटी क्रिकेट खेळताना त्यांना मला पाहायचे होते” असे सिराज पत्रकारांशी बोलताना म्हणाला. दरम्यान पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाच वर्चस्व होतं. मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोव्हस्की (६२)यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं वर्चस्व राखलं आहे. पहिल्या दिवासाखेर ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या आहेत.