ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ पहिल्या डावात २४३ धावांत गारद; ख्वाजाचे शतक

भारताचा युवा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या भन्नाट फॉर्मात असून त्याचाच प्रत्यय रविवारी क्रीडाचाहत्यांनी पुन्हा अनुभवला. बेंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या चारदिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत सिराजने तब्बल आठ फलंदाजांना बाद करत कांगारूंची दैना केली. त्यामुळे सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतक झळकावूनदेखील भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या २४३ धावांत संपुष्टात आणला व दिवसअखेर बिनबाद ४१ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सुरेख सुरुवात केली. ख्वाजा व कुर्टिस पॅटरसन यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. मात्र सिराजने प्रथम पॅटरसन (३१) व त्यानंतर लगेचच ट्रेविस हेडला (४) बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पुढच्याच षटकात सिराजने पिटर हँडस्कॉब व कर्णधार मिचेल मार्श या दोघांनाही शून्यावर पायचीत पकडले. त्यामुळे १ बाद ७८ वरून ऑस्ट्रेलियाची ४ बाद ९० धावा अशी घसरगुंडी झाली. त्यानंतर ख्वाजाने एम. लबुस्चग्ने यांनी संघाचा डाव सावरला.

दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. भारताची सामन्यावरील पकड सुटत आहे, असे वाटत असतानाच सिराज संघासाठी पुन्हा एकदा धावून आला. त्याने लबुस्चग्नेला ६० धावांवर बाद करत वैयक्तिक पाचवा बळी मिळवला. कुलदीप यादवने पुढील दोन बळी मिळवत सिराजला सुरेख साथ दिली. दुसरीकडे ख्वाजाने एका बाजूने शतकाला गवसणी घातली. अखेरीस सिराजनेच ख्वाजाला १२७ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. सिराजने कारकीर्दीतील सवरेत्कृष्ट कामगिरी करताना गेल्या चार प्रथम श्रेणी सामन्यांत तिसऱ्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली.

प्रत्युत्तरात, भारताचे सलामीवीर रविकुमार समर्थ व मयांक अगरवाल यांनी उर्वरित १२ षटके खेळून काढली व दिवसअखेर अनुक्रमे १० व ३१ धावांवर नाबाद राहत भारताचे वर्चस्व अबाधित राखले.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव) : ७५.३ षटकांत सर्वबाद २४३ (उस्मान ख्वाजा १२७, एम लबुस्चग्ने ६०; मोहम्मद सिराज ८/५९).
  • भारत ‘अ’ (पहिला डाव) : १२ षटकांत बिनबाद ४१ (रविकुमार समर्थ नाबाद १०, मयांक अगरवाल नाबाद ३१)