बंगळुरू एफसीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत मोहन बागान संघाने पहिल्यांदा आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. १-१ अशा बरोबरीसह बागानने आवश्यक गुणांची कमाई केली आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. बंगळुरू येथील कांतीवीरा स्टेडियम येथे झालेल्या लढतीत दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी झाली. मात्र जेतेपदासाठी मोहन बागानला बरोबरी पुरेशी होती. निर्धारित वेळ संपल्याची शिट्टी वाजताच मोहन बागानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
मोहन बागान संघाचे हे चौथे राष्ट्रीय जेतेपद आहे. आय लीग स्पर्धा आधी नॅशनल फुटबॉल लीग नावाने आयोजित करण्यात आली होती. २००२ मध्ये मोहन बागानने नॅशनल फुटबॉल लीगचे जेतेपद पटकावले होते.
जॉन जॉन्सनने ४१व्या मिनिटाला गोल करत बंगळुरूचे खाते उघडले. मध्यंतरानंतर बंगळुरूने बचाव अभेद्य करत मोहन बागानच्या आक्रमणाला रोखले. मोहन बागानचे जेतेपदाचे स्वप्न लांबणीवर पडणार असे चित्र होते. मात्र सामना संपायला केवळ चार मिनिटे बाकी असताना बेलो रसाक्यूने हेडरच्या साथीने निर्णायक गोल करत मोहन बागानला बरोबरी करून दिली. सामन्याअखेर मोहन बागानचे ३९ तर बंगळुरू एफसीचे ३७ गुण झाले. दोन गुणांच्या आघाडीच्या बळावर मोहन बागानने सरशी साधली.  या जेतेपदासह मोहन बागानने १३ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला.
कांतीवीरा स्टेडियममधील ओलसर खेळपट्टीशी जुळवून घेताना मोहन बागानला सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र स्थिरावल्यानंतर त्यांनी सर्वाधिक वेळ चेंडूवर नियंत्रण राखले.