बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधीच ऑस्ट्रेलिया संघातील एकापाठोपाठ एक खेळाडू जखमी होत आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन एबॉट दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार आहे. ऐडलेड कसोटी सामन्यापूर्वी अष्टपैलू मोईसेस हेनरिक्सला ऑस्ट्रेलियानं आपल्या संघात स्थान दिलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे सीन एबॉट पहिल्या कसोटी सामन्यातून संघाबाहेर गेला. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होऊ शकतो, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितलं आहे. एबॉटच्या जागी संघात हेनरिक्सची निवड झाली आहे. भारत अ विरुद्ध झालेला दुसरा सराव सामना स्नायू दुखावल्यानं हेनरिक्स खेळू शकला नव्हता. सोमवारी झालेल्या फिटनेस चाचणी पास झाल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. हेनरिक्स ऑस्ट्रेलियाकडून २०१६ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता तब्बल चार वर्षानंतर त्याचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सुखद बातमी!
दुखापतींच्या चक्रात अडकलेल्या ऑस्ट्रेलिया संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतग्रस्त अष्टपैल खेळाडू कॅमेरुन ग्रीनच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मिचेल स्टार्कही परतला आहे.