२०१९ विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतर भारतीय संघात पडलेली दुही आणि विराट-रोहितमधल्या वादाच्या बातम्या समोर आल्या. विंडीज दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती देत, रोहितकडे नेतृत्व देण्याची बातमीही मध्यंतरी समोर आली. मात्र विराटने ऐनवेळी निर्णय बदलत विंडीज दौऱ्यात खेळण्याचा निर्णय घेतला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची विंडीज दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली. मात्र विश्वचषकात झालेल्या पराभवाने आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं, विराटने टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं आहे.

“माझ्या आयुष्यात मी अनेकदा अपयशाचा सामना केला आहे, आणि वेळोवेळी त्यामधून शिकलोय. एखाद्या महत्वाच्या स्पर्धेत जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागतो, त्यावेळी आपल्यात काय सुधारणा करायला हवी याची कल्पना येते. याचसोबत कठीण काळात कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण तुमची साथ सोडून जातंय याचीही तुम्हाला कल्पना येते.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विराटने टीम इंडियातील दुहीवर सूचक विधान केलं.

ज्यावेळी तुमचा संघ एखाद्या चुकीमुळे महत्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडतो, त्यावेळी आपण त्या चुका दाखवू शकतो. मात्र संपूर्ण स्पर्धेत फारशा चुका न करता चांगला खेळ करत असताना, अचानक एका सामन्यात पराभवामुळे तुमचं आव्हान संपतं. खेळाडू म्हणून ही गोष्ट पचवणं कठीण असतं. उपांत्य फेरीत भारतीय संघाच्या पराभवाबद्दल विराट बोलत होता.

उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजी क्रमावरुन विराट-रोहितमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं होतं. त्यातच बीसीसीआयने भारताच्या पराभवाची गंभीर दखल घेतली. मध्यंतरीत्या काळात बीसीसीआय मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारताचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवून, विराटला कसोटी संघाची जबाबदारी देणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र या केवळ अफवा असल्याचं समोर आलंय. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या संघात विराट कोहलीकडेच तिन्ही प्रकारच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.