कबड्डीसारख्या मराठी मातीच्या खेळात बक्कळ पैसा आला मात्र त्याचे दुष्परिणाम होत खेळाचा आत्माच हरविला आहे, त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धामध्ये महाराष्ट्राची पीछेहाट होत आहे. हे विचार व्यक्त केले आहेत ज्येष्ठ कबड्डीपटू वासंती सातव-बोर्डे यांनी.
वासंती यांनी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धामध्ये महाराष्ट्राकडून खेळताना नावलौकिक मिळविला होता. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला वर्चस्व मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होत आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त
केली.
वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धामध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांत महाराष्ट्राची पीछेहाट होत आहे. त्याचे  कारण काय असू शकते?
सांघिक कामगिरीपेक्षा वैयक्तिक खेळाला प्राधान्य देण्यावरच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा कल दिसून येऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भारताचेच वर्चस्व असते. विजेतेपद मिळविले की भरपूर पैशाची कमाई या खेळाडूंना करता येते. त्यामुळेच भारतीय संघात स्थान मिळविण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवत फक्त वैयक्तिक कौशल्यास प्राधान्य दिले जात आहे. हे खेळाडू महाराष्ट्रासाठी खेळत नाही असेच चित्र बऱ्याच वेळा दिसून येते. संघनिष्ठेचा व जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊर्मीचा अभावच दिसतो. महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून द्यावे अशी इच्छाच त्यांच्याकडे दिसून येत नाही.
महाराष्ट्राच्या पराभवाला सदोष निवड पद्धत जबाबदार आहे काय?
पूर्वी खेळाडूंच्या जागांप्रमाणे निवड होत नसे. आता कॉर्नरचा खेळाडू, चढाईपटू आदी विचार करून निवड केली जात आहे. तरीही अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा संघ निवडला जात नाही. काही प्रशिक्षक आपला खेळाडू संघात कसा बसेल याचाच विचार करतात. एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याआधी खेळला असेल पण सध्या तो फॉर्ममध्ये नसेल व त्याच्यापेक्षा अन्य खेळाडू अधिक चांगले कौशल्य दाखवत असेल तर या खेळाडूस प्राधान्य दिले पाहिजे. खेळाडूंची निवड करताना वशिलेबाजीऐवजी कौशल्य व सध्याची कामगिरी यास अधिक महत्त्व दिले पाहिजे. जिल्हा स्तरापासूनच या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे.
महाराष्ट्रातील कबड्डीचा दर्जा खालावत आहे काय?
हो, निश्चितच. खेळात व्यावसायिकता आली असली तरी खेळातील आनंद संपला आहे. केवळ बक्षिसांच्या आमिषानेच खेळाडू खेळतात की काय अशी शंका येऊ लागली आहे. आमच्या वेळी कव्हर कसे ठेवायचे, चढायांच्या वेळी पावले कशी टाकायची आदी तंत्र फारसे शिकवले जात नसे. आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करायचा तरीही राष्ट्रीय स्तरावर आमचेच वर्चस्व असायचे. आता खेळाडूंना अन्य अनेक गोष्टींचे आकर्षण वाटू लागले आहे. एकूणच विविध वाहिन्यांच्या आक्रमणामुळे मैदानाची ओढ कमी होऊ लागली आहे. पूर्वी शाळांमधून खेळाडू घडत असत. आता शाळांनाच मैदाने राहिलेली नाही तर खेळाडू कसे होणार ही मोठी समस्याच आहे. पूर्वी खेळाडू केवढय़ा मोठय़ाने कबड्डी म्हणत असत. आता हे खेळाडू काय म्हणतात हेच कळत नाही. राज्यातील स्पर्धाची संख्या वाढली असली तरी खेळाडूंची लवकर दमछाक होत आहे. आपले खेळाडू केवळ बोनस गुण मिळविण्याचाच विचार करतात.
खेळातील शिस्त नाहीशी होत आहे का?
दुर्दैवाने हल्लीच्या खेळाडूंमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, प्रशिक्षकांविषयी आदर या वृत्तींचा अभावच दिसून येत आहे. एखाद्या प्रशिक्षकाने खूप कष्ट करून खेळाडू घडवायचा आणि या खेळाडूने काही प्रलोभनांकरिता दुसऱ्या क्लबकडे धाव घ्यायची ही वृत्ती खेळास मारक आहे. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षक यांच्यातील सुसंवाद हरवत चालला आहे.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे खेळाडू तंदुरुस्तीत कमी पडत आहेत काय ?
होय. पंजाब, दिल्ली, हरयाणा आदी राज्यांच्या तुलनेत आपले खेळाडू शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीत कमी पडतात. रेल्वे किंवा दिल्लीचा संघ प्रतिस्पर्धी म्हणून आला की सामन्यापूर्वीच आपले खेळाडू पराभव मान्य करीत मैदानावर उतरतात. आपण या बलाढय़ प्रतिस्पध्यरंना पराभूत करू शकतो अशी इच्छाच त्यांच्याकडे नसते.
ग्रामीण भागातून अपेक्षेइतके नैपुण्य पुढे येत नाही असे तुम्हास वाटते काय?
होय. आजकाल बरेचसे संघ एकखांबी तंबूसारखे झाले आहेत. एक दोन खेळाडूंवरच त्या संघाची संपूर्ण मदार असते. हा खेळाडू निवृत्त झाला की संघ बंद पडतो अशी अवस्था होते. महाराष्ट्रात स्पर्धाची संख्या वाढली असली तरी दोन तीन शहरांमधीलच संघ त्यामध्ये वर्चस्व गाजविताना दिसतात. खेळासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. राज्य कबड्डी संघटनेने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.