आयपीएलच्या तेराव्या हंगामावरुन सध्या बराच गोंधळ सुरु आहे. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर काळात स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसी टी-२० विश्वचषकाबद्दल काय निर्णय घेतं याची वाट पहावी लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियातील प्रस्तावित टी-२० विश्वचषक रद्द झाल्या, आशिया चषक आणि PSL स्पर्धेच्या आयोजनावरुन पाक क्रिकेट बोर्डाशी सुरु असलेल्या वाटाघाटी हा देखील बीसीसीआयसमोर एक महत्वाचा मुद्दा आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आयपीएल खेळवण्याची गरज आहे का, असा टीकेचा सूर गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर पहायला मिळाला. यासाठी बीसीसीआयवरही टीका झाली. परंतू आयपीएलमधून येणारा पैसा हा खेळाडूंसाठी वापरला जातो, तो गांगुली आणि जय शहांसाठी वापरला जात नाही अशी प्रतिक्रीया बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी दिली आहे.

“फक्त पैशांसाठी आयपीएलचं आयोजन केलं जात आहे, अशी टीका गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे, ठीक आहे काही फरक पडत नाही. हा पैसा जातो कोणाला?? आयपीएलमधून येणारा पैसा हा खेळाडूंसाठी वापरला जातो, तो अधिकाऱ्यांना मिळत नाही. स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटन, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा पैसा वापरला जातो. मग या गोष्टीला विरोध का होतोय?? स्पर्धेचे आयोजक, तसेच प्रत्येक खेळाडूला पैसा मिळत आहे. प्रसारमाध्यमांनी आपल्या भूमिकेत बदल करण्याची गरज आहे, स्पर्धेचं महत्व समजावून सांगायला हवं. बीसीसीआय प्रत्येकवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरतं. हा पैसा देशासाठी वापरला जातो, गांगुली किंवा जय शहां किंवा माझ्यासाठी नाही. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनासाठी पैसा खर्च होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे.” Cricbuzz शी बोलत असताना धुमाळ यांनी आपलं परखड मत मांडलं.

२९ मार्चरोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र देशात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने सर्वात प्रथम १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलली. मात्र तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. मात्र आर्थिक नुकसान लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन करण्याची तयारी केली आहे.