‘मंकीगेट’ प्रकरणामुळेच अँड्रय़ु सायमंड्स या गुणवान खेळाडूची क्रिकेट कारकीर्द फुलायच्या अगोदरच संपुष्टात आली, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने येथे सांगितले. २००८ मध्ये भारताचा क्रिकेटपटू हरभजनसिंग याने कसोटी सामन्यात सायमंड्सला जातीय अपशब्द उच्चारल्याचे आरोप करण्यात आले होते.
सायमंड्सला या प्रकरणात अपेक्षेइतके सहकार्य आमच्या क्रिकेट मंडळाकडून लाभले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दबावापुढे क्रिकेट ऑस्ट्रेलिया झुकली.
जर आमच्या क्रिकेट संघटकांनी हे प्रकरण लावून धरले असते तर भारतीय खेळाडूचा खरा चेहरा उघडकीस आला असता व सायमंड्स याची कारकीर्द सुरळीत झाली असती, असे सांगून पॉन्टिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियाने मला आदेश दिल्याप्रमाणे मी करीत राहिलो. मात्र अन्य काही संघटकांनी भारतीय संघटकांवर दबाव आणला असता, हरभजनवर तीन वर्षांची बंदी आणली गेली. मात्र भारतीय संघटकांनी त्याविरुद्ध अपील करीत त्याची शिक्षा रद्द करण्यात यश मिळविले. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला.