अहमदाबादच्या मोदी स्टेडिअममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसरा कसोटी सामना सुरु आहे. प्रथम गोलंदाजी करत अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्या फिरकीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला ११२ धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय संघानं दिवसाखेर तीन गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावा केल्या आहेत. दिवसाच्या अखेरच्या षटकांत भारतीय कर्णधार विराट कोहली बाद झाला. कोहलीनं २७ धावांची छोटेखानी खेळी केली. बाद होण्यापूर्वी विराट कोहलीनं इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे.

इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा नवीन विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराट कोहलीनं इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी इंग्लंडविरोधात एकाही भारतीय फलंदाजाला २००० धावा काढता आल्या नव्हत्या. याआधी भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा कर्णधार एम.एस. धोनी होता. धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व करताना इंग्लंड संघाविरोधात १९१० धावा चोपल्या होत्या.

कर्णधार असताना इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. बॉर्डर यांनी कर्णधार असताना इंग्लंडविरोधात ३१९१ धावा चोपल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ (२९७८) तर तिसऱ्या स्थानावर रिकी पाँटिंग (२७२६) आहे. डॉन ब्रॅडमन चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी २४३२ धावा चोपल्या आहेत.