News Flash

आव्हानांचा डोंगर!

जैव-सुरक्षित वातावरणाची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे

(संग्रहित छायाचित्र)

तुषार वैती

गेली आठ महिने भारतात करोनाचे तांडव सुरू आहे. आता कुठे काही गोष्टी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असतानाच इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) निमित्ताने देशातील क्रीडाप्रेमींना आशेचा किरण दिसू लागला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीगचा थरार (आयपीएल) दुबईत खेळवावा लागला. पण टाळेबंदीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ‘आयएसएल’च्या रूपाने देशात पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सुरू झाली आहे. गोव्यात तीन स्टेडियमवर होणाऱ्या लढती, जैव-सुरक्षित वातावरण, करोनाचा धोका या सर्वाचा विचार करता संयोजकांना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

करोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था संकटात आली असताना युरोपातील इंग्लिश प्रीमियर लीग अथवा ला-लीगा स्पर्धेचे अनुकरण करणाऱ्या ‘आयएसएल’सारख्या स्पर्धेचे आयोजन करणे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. पण रिलायन्ससारखा भक्कम समूह पाठीशी असल्याने त्यांना पैशांची फारशी चिंता नाही. जैव-सुरक्षित वातावरणाची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे. अन्य मोसमापेक्षा यंदाचे पर्व वेगळे असणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने गोव्यात होणार असल्यामुळे कोणत्याही संघाला प्रवास करावा लागणार नाही. वास्कोतील टिळक मैदान, बाम्बोलिम येथील जीएमसी अ‍ॅथलेटिक स्टेडियम आणि फतोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी ११५ सामने होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० सामने अधिक खेळवण्यात येणार आहेत.

एससी ईस्ट बंगाल आणि एटीके मोहन बागानचा (पूर्वीचा अ‍ॅटलेटिको डी कोलकाता आणि मोहन बागानचे एकत्रीकरण) समावेश करण्यात आल्यामुळे यंदा ११ संघांमध्ये ‘आयएसएल’चे सातवे पर्व रंगणार आहे. प्रेक्षकांविना बंदिस्त स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडू, व्यवस्थापन आणि संयोजकांना मोठय़ा आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. सर्व संघांना आपल्या हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे. सरावासाठी मैदानावर अथवा सामन्यांसाठी स्टेडियममध्ये जाताना खेळाडूंच्या हालचालींवर मर्यादा असतील. खेळाडूंना हॉटेलमध्ये वावरण्यासही मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना संपूर्ण वेळ चेहऱ्यावर मुखपट्टी लावून फिरावे लागणार आहे.

खेळाडूंना बंदिस्त वातावरणात ठेवणे आवडत नाही. ‘आयपीएल’च्या यशानंतर थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जैव-सुरक्षित वातावरणात अधिक काळ राहणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले होते. या वातावरणाविषयी एक प्रकारे कोहलीची ती नाराजीच होती. आता तब्बल पाच महिने जैव-सुरक्षित वातावरणात राहणे कठीण आहे, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केल्याने आता आणखीन फुटबॉलपटू या वातावरणाविषयी नाराजी व्यक्त करतील. स्पर्धेदरम्यान जैव-सुरक्षित वातावरणात राहण्याची खेळाडूंना सवय नाही. त्यामुळे स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसा खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागेल. प्रत्येक संघाने स्वत:चा आरोग्य आणि स्वच्छता अधिकारी नेमल्याने खेळाडूंकडून जैव-सुरक्षा नियमांचे उल्लंघन होतेय की नाही, यावर बारकाईने नजर ठेवण्यात येईल. मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील तणावपूर्ण वातावरणामुळे खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी होण्याची अपेक्षा तशी कमीच आहे.

करोनाचा धोका पाहता, प्रत्येक संघाला तीनऐवजी पाच बदली खेळाडू मैदानात पाठवण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक संघात किमान पाच आणि जास्तीत जास्त सात परदेशी खेळाडू समाविष्ट करता येणार आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये एक जण आशिया फुटबॉल महासंघाशी संलग्न असावा. सामन्यात सहा भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक जण विकसनशील म्हणजेच होतकरू असावा, असाही नियम आहे. पण खेळाडूंना स्पर्धेदरम्यान होणाऱ्या दुखापती अथवा करोनाची लागण झाल्यास, प्रत्येक संघाला हे नियम पाळावे लागणार आहेत.

इंडियन सुपर लीग फु टबॉलला या आठवडय़ात सुरुवात झाली. पण सरावाचे सुरुवातीचे २० दिवस यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्यांच्यासमोर खरी आव्हाने पुढे असणार आहेत. करोनाची दुसरी लाट येणार अशी जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास, पाच महिने चालणाऱ्या या स्पर्धेला मध्येच थांबवावी लागण्याची चिन्हे आहेत. टाळेबंदीनंतर देशात पहिल्यांदाच मोठय़ा स्पर्धेचे आयोजन के ले जात आहे, पण संयोजकांसमोर आव्हानांचा डोंगर असणार आहे, हे मात्र निश्चित.

tushar.vaity@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:14 am

Web Title: mountain of challenges on indian super league abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पितृशोक असतानाही सिराजचे राष्ट्रहिताला प्राधान्य
2 थिमची जोकोव्हिचवर सरशी
3 फ्रेंच लीग फुटबॉल : मोनॅकोची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Just Now!
X