13 November 2019

News Flash

मध्य प्रदेशसमोर मुंबईचे आव्हान

अखिल हेरवाडकरने रेल्वेविरुद्ध दोन्ही डावांत दिमाखदार खेळी साकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचला होता.

घरच्या मैदानावर चौथ्या डावात २९५ धावांचे आव्हान पेलत थरारक विजय साकारणाऱ्या मुंबई संघाची रणजी क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेशशी लढत होत आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडिमयवर मध्य प्रदेशवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील आहे.
अखिल हेरवाडकरने रेल्वेविरुद्ध दोन्ही डावांत दिमाखदार खेळी साकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचला होता. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावलेला श्रेयस अय्यर मध्य प्रदेशविरुद्धही मोठी खेळी साकारण्यासाठी आतुर आहे. सिद्धेश लाड, आदित्य तरे यांच्याकडूनही अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादवला अद्याप सूर गवसलेला नाही. निखिल पाटीलने पदार्पणाच्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती. आपण एका लढतीचा चमत्कार नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी निखिलवर आहे. शार्दूल ठाकूर मुंबईसाठी हुकमी एक्का आहे. धवल कुलकर्णी, हरमित सिंग, बलविंदर संधू आणि विशाल दाभोळकर यांनी साथ दिल्यास मुंबईचे आक्रमण मध्य प्रदेशसाठी अडचण ठरू शकते.
भारतीय संघात नियमित यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळवण्यासाठी उत्सुक नमन ओझाला मोठी खेळी करण्याची उत्तम संधी आहे. ३८ वर्षीय कर्णधार देवेंद्र बुंदेला मध्य प्रदेशचे आशास्थान आहे. गोलंदाजीत ईश्वर पांडे आणि जलाज सक्सेना यांच्यावर मध्य प्रदेशची भिस्त आहे. असंख्य गुणी युवा खेळाडूंचा समावेश ही मध्य प्रदेशसाठी जमेची बाजू आहे.

First Published on November 23, 2015 2:32 am

Web Title: mp challenge in front off mumbai in ranji cricket
टॅग Mp,Mumbai,Ranji Cricket