१५ ऑगस्टला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामातही धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाची खराब कामगिरी झाली. यानंतर धोनी आता काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये राहत होता. याच फार्म हाऊसमध्ये धोनी आता कडकनाथ कोंबड्या पाळणार असल्याचं कळतंय. मध्यप्रदेशातील भिलांचल भागात प्रसिद्ध असलेली काळी कोंबडी ही कडकनाथ नावाने ओळखली जाते. या कोंबडीला व तिच्या अंड्यांना बाजारात मोठी मागणी असते. मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून धोनीने आपल्या रांची येथील फार्म हाऊससाठी २ हजार कोंबड्यांची ऑर्डर दिल्याचं कळतंय.

झबुआ जिल्ह्यातील थांडला गावात राहणारा शेतकरी विनोद मेधाला धोनीच्या टीममधील मॅनेजरने संपर्क साधून या कोंबड्यांची ऑर्डर दिली होती. १५ डिसेंबरपर्यंत या शेतकऱ्याला धोनीला कडकनाथ कोंबड्यांचे २ हजार पक्षी द्यायचे आहेत. “तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या फार्म हाऊसमधील मॅनेजरने कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला होता. चौकशी केल्यानंतर पाच दिवसांपूर्वी त्यांनी मला २ हजार कोंबड्यांची ऑर्डर दिली. १५ डिसेंबरपर्यंत मला या कोंबड्या रांचीला पोहचवायच्या आहेत. यासाठीचं Advance Payment ही धोनीच्या टीमने केलं आहे. देशातल्या सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या फार्ममध्ये माझ्या कोंबड्या जाणार आहेत याचा मला अभिमान आहे.” विनोद मेधा यांनी माहिती दिली.

कसं आहे धोनीचं रांचीतलं फार्महाऊस?? – पाहा फोटो

मध्य प्रदेशातील कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ कोंबडी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी असणाऱ्या डॉ. चंदन कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “धोनीच्या फार्म हाऊसचं मॅनेजमेंट सांभाळणारा कुणाल गौरव याने काही दिवसांपूर्वी रांचीत कडकनाथ कोंबड्यांबद्दल चौकशी केली होती. मी देखील त्याच कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला याबद्दल समजलं. मग आम्ही मध्य प्रदेशात कोणाकडे मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी मिळेल याचा तपास केला. त्यानंतर विनोद मेधा यांचं नाव आम्हाला समजलं.” चंदन कुमार यांनी The New Indian Express ला माहिती दिली. रांची येथील आपल्या ४३ एकराच्या फार्म हाऊसवर धोनीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धोनी आता कडकनाथ कोंबड्याही पाळणार आहे.