फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगभरातील १०० श्रीमंत खेळाडूंच्या यादीत भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने २३ वा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. अमेरिकेचा बॉक्सिंगपटू फ्लाईड मेवेदर हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला असून, या यादीमध्ये गोल्फपटू टायगर वुडस, टेनिसपटू रॉजर फेडरर आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचादेखील समावेश आहे. गेल्यावर्षीच्या क्रमवारीनुसार महेंद्रसिंग धोनीच्या स्थानात एका क्रमांकाची घसरण झाली आहे. धोनीने एका वर्षात ३१ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली असून यामध्ये क्रिेकेट सामन्यांच्या माध्यमातून मिळवलेला ४ दशलक्ष डॉलर्स आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळविलेल्या २७ दशलक्ष डॉलर्सच्या उत्पन्नाचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती असलेल्या महेंद्रसिंग धोनीने गेल्यावर्षीच्या अखेरीस कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.
दरम्यान, सर्वात श्रीमंत खेळाडू ठरलेल्या फ्लाईड मेवेदरच्या कमाईचा आकडा ३०० दशलक्ष डॉलर्स इतका आहे. ही रक्कम यापूर्वी कोणत्याही खेळाडूने सर्वाधिक कमाई केलेल्या रक्कमेच्या दुप्पट आहे. यापूर्वी टायगर वुडस यांनी २००८ साली सर्वाधिक ११५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती. गेल्या चार वर्षांत मेवेदरने तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी राहण्याचा मान मिळवला आहे.