कोणत्याही कर्णधाराला आपल्या संघात एका अनुभवी खेळाडूची गरज असते. कठीण प्रसंगामध्ये कर्णधार या अनुभवी खेळाडूकडून मदतीची अपेक्षा करत असतो. विराट कोहलीच्या भारतीय संघात सध्या ही भूमिका महेंद्रसिंह धोनी निभावतो आहे. गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यापासून ते विराटला महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये धोनी मदत करत असतो. याचमुळे विश्वचषकासाठी धोनीचं भारतीय संघात असणं हे विराटसाठी फायद्याचं असल्याचं वक्तव्य भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केलं आहे.

“भारतीय संघात धोनीसारखा खेळाडू विराटच्या दिमतीला आहे ही त्याच्यासाठी सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे. आतापर्यंत अनेकदा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडलेला असतो, त्यावेळी धोनी विराटला क्षेत्ररक्षणातील बदलांपासून, गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यापर्यंत मदत करत असतो. या दोघांमधला मैदानातला ताळमेळ अतिशय उत्तम आहे. त्यांच्यातला हाच ताळमेळ भारताला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो.” India Today वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना गावसकरांनी आपलं मत मांडलं.

मध्यंतरीच्या काळात धोनीचा फॉर्म ढासळलेला असताना, विश्वचषकासाठी धोनीचा विचार करु नका अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. मात्र ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत धोनीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे विराट-धोनीची जोडी विश्वचषकात नेमका कसा खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.