भारतीय वन-डे संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने, मुंबईचा तरुण खेळाडू श्रेयस अय्यरला मोलाचा सल्ला दिला आहे. खेळावर आपलं लक्ष केंद्रीत करण्यासाठी धोनीने श्रेयसला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा आणि वर्तमानपत्र न वाचण्याचा सल्ला दिला आहे. श्रेयस अय्यरने नुकतीच भारत अ संघाकडून इंग्लंड दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे.

Open House with Renil या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये बोलत असताना श्रेयस अय्यरने या गोष्टीचा खुलासा केला आहे. सध्याच्या भारतीय संघातील बहुतांश खेळाडू हे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. अनेकदा एखाद्या सामन्यात खराब कामगिरी केली किंवा सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागलं आहे. मात्र सध्याच्या घडीला असणारी स्पर्धा पाहता, तरुण खेळाडूंनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणं अधिक गरजेचं आहे. सोशल मीडिया व वृत्तपत्रातील टीकेमुळे खेळाडूचं लक्ष विचलीत होण्याची शक्यता असते. याच कारणासाठी धोनीने आपल्याला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचं श्रेयस म्हणाला.

धोनीने आपल्याला जरीही सल्ला दिला असला तरीही आपण सोशल मीडियाचा वापर सांभाळून करत असल्याचंही श्रेयसने स्पष्ट केलं. अनेकदा आपल्या खेळांविषयी प्रतिक्रीया चाहत्यांकडून सोशल मीडियाद्वारे आपल्याला कळतात. याचसोबत अधुनमधून होणाऱ्या टीकेमधूनही आपल्याला चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळत असते असं श्रेयस म्हणाला. वेळोवेळी आपल्या संघातील तरुण सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना धोनीला आपण पाहिलं आहे. अनेकदा सामन्यांदरम्यान यष्टींमागून धोनी गोलंदाजांना सुचना करत असतो. त्यामुळे धोनीने दिलेला सल्ला श्रेयस अय्यर पाळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.