आयपीएल २०१५: पुणे आणि राजकोट संघांसाठीचा लिलाव
भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पुण्याच्या संघातून खेळताना दिसणार आहे. धोनीसोबतच अजिंक्य रहाणे, आर.अश्विन यांचाही पुण्याच्या संघात समावेश झाला आहे. आयपीएलमध्ये दोन वर्षांसाठी नव्याने दाखल झालेले पुणे, राजकोटच्या संघबांधणीसाठी मंगळवारी खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात ड्राफ्ट पद्धतीने पाच खेळाडूंना संघात घेण्याची सुविधा होती. त्यानुसार पुणे संघाच्या फ्रँचायझीने महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, स्टीव्हन स्मिथ, फॅफ डू प्लेसिस या नावाजलेल्या खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतले.
तर  रवींद्र जडेजा, सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्क्युलम , जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो या पाच खेळाडूंना राजकोट फ्रँचायझीने आपल्या कळपात सामील करून घेतले आहे. पुणे फ्रँचायझीने धोनीला आणि राजकोटने रैनाला १२.५ कोटीत संघात दाखल करून घेतले. राहणेसाठी पुणे फ्रँचायझीने ९.५ कोटी मोजले, तर त्याच किमतीत राजकोटने जडेजाला संघात समाविष्ट केले. अश्विन, मॅक्क्युलम यांच्यावर प्रत्येकी ७.५ कोटींची बोली लागली. स्मिथ आणि फॉकनर यांच्यावर दोन्ही फ्रँचायझीने प्रत्येकी ५.५ कोटी खर्च केले आहेत.
कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका यांनी पुण्याची फ्रँचायझी विकत घेतली आहे, तर इन्टेक्स मोबाइल कंपनीने राजकोटची फ्रँचायझी विकत घेतली आहे.