भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग निवृतीनंतर सध्या क्रिकेटच्या मैदानातील खेळाचे समालोचन करण्यात व्यस्त आहे. त्याच्या खास समालोचनाची क्रिकेट चाहतेही चांगलेच आनंद घेत आहेत. पण मोहालीच्या मैदानात सोमवारी सेहवागने विराट कोहलीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्वांना हैराण केले. भारत आणि इंग्लड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करताना सेहवागने विराट कोहलीच्या खराब कामगिरीची आठवण करुन दिली. सध्या प्रत्येक सामन्यात बहरात दिसणारा विराट कोहली २०१२ मध्ये अपयशी ठरत होता. त्याची त्यावेळीची खेळी पाहता भारतीय कसोटी संघात कोहलीला निवड समितीने कधीच स्थान दिले नसते. असे सेहवागने म्हटले. मात्र धोनीमुळे विराटला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. असे सेहवाग यावेळी म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील कोहलीच्या निराशजनक कामगिरीनंतर निवड समिती त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा विचार करत होती. पहिल्या दोन कसोटी सामन्यात कोहलीने १०.७५ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यावेळी सेहवाग भारताचा उप कर्णधार होता. धोनीसोबत चर्चा करुन कोहलीला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सेहवागने सांगितले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थच्या मैदानावर कोहली ऐवजी राहित शर्माही निवड समितीची पसंती होती. मी आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विराटचे समर्थन केले. त्याचा परिणाम आपण पाहत आहात, असे सेहवाग म्हणाला. पर्थच्या कसोटी सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ४४ आणि ७५ धावा केल्या होत्या . त्यानंतर एडलेडच्या मैदानावर कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहले शतक झळकावले होते. २०१२ मध्ये संघर्ष करणारा विराट कोहली सध्या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करत असून त्याच्या फलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विराट कोहली प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघासाठी  डोकेदुखी ठरत आहे.  कोहलीची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी देखील केली जाते.