जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखला जाणारा भारताचा एम. एस. धोनी हा सतत चर्चेचा विषय असतो. काही आठवड्यांपूर्वीच धोनी निवृत्त होण्याची अफवा सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली होती. सध्या लॉकडाउन सुरु असल्याने क्रिकेटच्या मैदानावर शांतता असली तरी धोनी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी झिवाबरोबरच व्हिडिओ तर कधी ट्रॅक्टर घेणे अशा अनेक कारणांनी मागील काही दिवसांपासून धोनी चर्चेत आहे. असं असतानाच आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असणाऱ्या राहुल द्रविडने धोनीबद्दल भाष्य केलं आहे.

मागील काही वर्षांपासून धोनीच्या फलंदाजीवर सतत प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहेत. गरजेच्या वेळी धोनी अगदी संथ खेळतो, धोनीच्या फलंदाजीमध्ये आधीसारखी जादू राहिली नाही, धोनी थकलेला वाटतो अशा पद्धतीच्या टीका मागील काही वर्षांपासून धोनीच्या टीकाकारांनी केल्या आहेत. मात्र धोनी फलंदाजी करताना निकालाचा विचार करत नाही असं मत द्रविडने व्यक्त केलं आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोला नुकतीच द्रविडने मुलाखत दिली. यावेळी मुलाखत घेणाऱ्या संजय मांजरेकर यांनी धोनीच्या शैलीसंदर्भात द्रविडला प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना द्रविडने धोनीच्या खास शैलीचे कौतुक तर केलचं पण त्याने हे कसं आत्मसात केलं आहे यासंदर्भात त्याच्याकडूनच माहिती घ्यायला हवी असं मतही व्यक्त केलं.

“धोनी काहीतरी वेगळं आणि महत्वाचं करतोय असं मला सतत वाटतं. मात्र त्याचवेळी तो निकाल महत्वाचे नसल्यासारखी फलंदाजी करतो. अशापद्धतीने खेळणं सोप्प नाहीय. तुमच्याकडे तशी विचारसणी असावी लागते किंवा ती तुम्हाला आत्मसात करावी लागते. माझ्याकडे ते नाही. मला निकालांची प्रचंड काळजी असते आणि त्याचा परिणाम होतो,” असं द्रविड म्हणतो. पुढे बोलताना त्याने धोनी ही खास शैली कुठून शिकला हे जाणून घ्यायला आवडेल असंही म्हटलं आहे. “आता त्याचा हा स्वभाव नैसर्गिक आहे की त्याने यावर काम केलं आहे हे त्याच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. उत्तम फिनिशर असाच असतो. ते स्वत:ची मानसिकताच अशी बनवून घेतात की ज्याचा त्यांना खेळताना फायदा होतो,” असंही द्रविड म्हणाला.

इंडिया ए आणि १९ वर्षाखालील संघांचे प्रशिक्षकपद भूषवलेला द्रविड हा त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जातो. त्यामुळेच त्याने धोनीबद्दल अशापद्धतीने थेट मत व्यक्त करताना त्याच्या शैलीचे कौतुक केल्याचं पहायला मिळत आहे.