भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पॅराशूट रेजिमेंटमधील खडतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. बुधवारी धोनी आपल्या युनिटमध्ये दाखल झाला. दोन महिने धोनीचे प्रशिक्षण चालणार आहे. धोनीच्या रेजिमेंटचे मुख्यालय बंगळुरुमध्ये आहे. भारतीय क्रिकेटची सेवा करणाऱ्या धोनीला लष्कराबद्दल असलेले प्रेम सर्वांना माहित आहे.
धोनीच्या या प्रशिक्षणामुळे युवकांमध्ये लष्करात दाखल होण्याबद्दल एक जागरुकता निर्माण होणार असून धोनीलाही तेच हवे आहे असे सूत्रांनी सांगितले.

पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. २०११ सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. अभिनव बिद्रा आणि दीपक रावसोबत धोनीला हे पद देण्यात आले होते. २०१५ साली धोनीने आग्रा येथे पॅराशूट जम्पिंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. पॅराशूट रेजिमेंट लष्कराची स्पेशल फोर्स आहे. शत्रूच्या प्रदेशात घुसून खास मोहिमा पार पाडण्याची जबाबदारी पॅराशूट रेजिमेंटवर सोपवली जाते.

अलीकडेच वर्ल्डकप संपल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. पण मागच्याच आठवडयात धोनीने आपण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे कळवले. त्यामुळे तूर्तास धोनीच्या निवृत्तीची चर्चा थांबली आहे. धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटप्रेमींमध्ये मतभेद आहेत. धोनी आता ३८ वर्षांचा असून पुढच्या वर्ल्डकपमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. त्यामुळे धोनीने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी असे अनेकांचे मत आहे.