भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी बुधवारी ४० वर्षांचा झाला. जगभरातील धोनी चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल नेटवर्किंगवरही धोनीच्या वाढदिवसानिमित्त अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होत होते. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीपासून ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयपर्यंत आणि सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत सर्वांनीच धोनीला शुभेच्छा दिल्या. मात्र अशाच भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या भाजपा खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने केलेल्या एका कृतीमुळे तो प्रचंड ट्रोल झाला आहे. गौतम गंभीर धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ट्रोल होण्यामागील कारणही फार मजेदार आहे.

झालं असं की धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच गंभीरने त्याच्या फेसबुक पेजवरील कव्हर फोटो बदलला. कव्हर फोटो बदलून गंभीरने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील फोटो कव्हर फोटो म्हणून ठेवला. या फोटोमध्ये डाइव्ह मारुन मळलेल्या जर्सीमध्ये गंभीर बॅटवर करुन अभिवादन करताना दिसत आहे. डावखुरा फलंदाज म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणाऱ्या गंभीरने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती. याच सामन्यातील हा फोटो आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच गंभीरने हा फोटो शेअर केल्याने २०११ च्या विश्वचषक जिंकून देण्यासाठी धोनीबरोबर मी सुद्धा तितकाच महत्वाचा वाटा उचलला होता असच सांगण्याचा प्रयत्न गंभीरने यामधून केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच गंभीरला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

एका चाहत्याने गंभीरने असं करणं हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तर धोनीच्या अन्य एका चहत्याने धोनीचं वैशिष्ट्य हे आहे की तो शांत आहे आणि निवृत्तीनंतर ते अशा लोकांकडे लक्ष देत नाही जे एखाद्या अंजेड्याअंतर्गत त्याच्याविरोधात काम करतात.

Gambhir puts his 2011 World Cup final photo as FB cover Gambhir puts his 2011 World Cup final photo as FB cover

गंभीरने फेसबुकवर कव्हर फोटो बदलल्यानंतर त्यावरही धोनीचे चहाते तुटून पडले आहेत. तू हे असं वागतो म्हणून लोक धोनीला अधिक किंमत देतात, तुझ्यात आणि धोनीमध्ये हाच फरक आहे की त्याने कधी सन्मान मागितला नाही तो त्याला मिळत गेला आणि तू कायम मागत राहिला, धोनीचा षटकार भारी होता या आणि अशा अनेक कमेंट गंभीरच्या कव्हर फोटोवर पहायला मिळत आहेत.

यापूर्वी गंभीरने धोनीविरोधात अनेकदा वक्तव्य केलेली आहेत. दोघांमध्येही ३६ चा आकडा असल्याचं सांगितलं जातं. २०११ चा विश्वचषक आपण केवळ धोनीमुळे जिंकलेलो नाही असं गंभीर यापूर्वी अनेकदा म्हणाला आहे. अनेकदा २०११ च्या विश्वचषकासंदर्भात बोललं जातं तेव्हा धोनीने केलेली ९१ धावांची नाबाद खेळी आणि षटकार लगावत जिंकून दिलेल्या सामन्याबद्दलच बोललं जातं. त्याच तुलनेत गंभीरने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात खेळलेल्या ९७ खेळीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं गंभीरचे चहाते म्हणतात. टी-२० विश्वचषकासंदर्भात एका मुलाखतीमध्ये बोलताना गंभीरने हा विश्वचषक जिंकवण्यात युवराजबरोबरच जहीर खानसारख्या खेळाडूंचाही सहभाग होता असं म्हटलं होतं.

भारतीय क्रिकेटमधील  सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या नेतृत्वावरही गंभीरने अनेकदा शंका उपस्थित केली आहे. धोनीला वारसा म्हणून चांगला संघ मिळाला होता. त्यामुळे त्याला नेतृत्व करणं अधिक सहज होतं. गंभीरच्या सांगण्याप्रमाणे सौरभ गांगुलीने खऱ्या अर्थाने संघ उभा केला.