इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-४ अशा फरकाने गमावल्यानंतर क्रिकेटप्रेमी, भारताचे माजी कर्णधार, निवृत्त क्रिकेटपटू सर्वांनी कोहलीच्या नेतृत्वावर तोफ डागली. गेल्या १५ वर्षांतील हा परदेशातील सर्वोत्तम कसोटी संघ आहे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले होते. त्यावर गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे. कोहलीला सामन्यानंतरसुद्धा हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा आपली सहमती दर्शवली होती. पण आता महेंद्रसिंग धोनीनेही या वादात उडी घेत भारतीय संघ या दौऱ्यावर अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघाने कसोटी मालिकेआधी सराव सामने खेळले. पण त्यांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे भारतीय संघाच्या कसोटी मालिकेतील अपयशाला कमी झालेला सराव जबाबदार आहे, असे रोखठोक मत धोनीने व्यक्त केले आहे.

कसोटी मालिकेआधी भारतीय संघाने अधिकाधिक सराव सामने खेळण्याची संधी गमावली. त्यामुळे फलंदाजांना चेंडूची गती, त्याच्या स्विंग याचा फारसा अंदाज येऊ शकला नाही. आणि फलंदाजी करणे कठीण होऊन बसले. पण हा खेळाचा भाग आहे. भारतीय संघ सध्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही, असेही त्याने नमूद केले.